
नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत मध्ये होणाऱ्या विकास कामासाठी खंडणी मागणारे दोन पत्रकार आणि एक कार्यकर्ता या तिघांना नांदेड येथून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाठविलेल्या पथकाने जेरबंद केले आहे. तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी
माकणी ता. मुखेड येथील डॉ.प्रविणकुमार रामराव गव्हाणे यांनी दि.17 फेबु्रवारी रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना भेटून सांगितले की, माकणी गावच्या सरपंच माझ्या पत्नी सौ.अनिता गव्हाणे आहेत. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार न करणे आणि वृत्तमानपत्रात बातमी न छापण्यासाठी पत्रकार विजय बनसोडे यांच्या मध्यस्थीने 2 लाख रुपये खंडणीची मागणी करीत आहेत. यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे यांना कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या.
या तक्रारीनुसार 17 फेबु्रवारी रोजी सायंकाळी दोन पंचासमक्ष पडताळणीचा सापळा रचण्यात आला. तेंव्हा तडजोडीनंतर डॉ.प्रविणकुमार गव्हाणे यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून पंचासमक्ष 15 हजार रुपये रोख रक्कम स्विकारली. तेंव्हा पत्रकार संजय सुदाम कांबळे, विजय बनसोडे, आणि माकणी येथील कार्यकर्ता पिराजी खंडू गवलवाड या तिघांना नांदेड येथून गेलेल्या पथकाने ताब्यात घेतले. या तिघांविरुध्द मुखेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 34 नुसार गुन्हा क्रमांक 49/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अबिनाशकुमार, खंडेराय धरणे, यांनी खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक मिटके, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, पोलीस अंमलदार पवार, बोधगिरे, शेख, मस्के, बिरादार, कदम आणि पठाण यांचे कौतुक केले आहे.
या प्रकरणाचा तपास मुखेड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. आज विनोद चव्हाण यांनी पकडलेल्या तिघांना मुखेड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.