नांदेड (प्रतिनिधी)- शिवाजीनगर पोलिसांनी निजामबाद येथून चोरी करून आणलेल्या मोटारसायकलसह एका युवकाला पकडल्यानंतर त्याच्याकडे एक घातक हत्त्यार पण सापडले.
दि. 25 जुलै रोजी रात्री 9 वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गस्ती पथक काम करत असताना श्रावस्तीनगर भागात त्यांना एक युवक बिनानंबरच्या दुचाकीवर दिसला. त्याची माहिती घेतली असता त्याचे नाव अनिल नारायण पातरोड (25) रा. बाळापूर ता. धर्माबाद ह.मु. समतानगर धर्माबाद असे आहे. त्याची तपासणी केली असताना त्याच्या कमरेला एक घातक शस्त्रही होते. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी त्या युवकाविरूद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्र. 283/2021 दाखल केला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकी गाडीबद्दल विचारणा केली असता त्याने ती गाडी सिलपल्ली रोड निजामबाद, राज्य तेलंगणा येथून चोरून आणल्याचे कबूल केले. या संदर्भाने निजामबाद टाऊन-4 या पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा क्र. 183/2021 दाखल आहे. निजामबाद राज्यातील चोरून आणलेली ही दुचाकी गाडी पकडून उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस निलेश मोरे यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक ए.एन. नरूटे, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहूळे, पोलीस अंमलदार संजय मुंडे, दिलीप राठोड, बालाजी रावळे, रवी बामणे, काकासाहेब जगताप आणि मधुकर आवातरीक यांचे कौतुक केले आहे.
