नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत नांदेड शहरातील नागरीकांना दररोज पाणी पुरवठा होईल अशी योजना मंजुर केल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी केली.
मंगळवारी महापालिकेेत स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देखभाल दुरूस्तीच्या दहा ठरावांना मान्यता देण्यात आली. दलितवस्ती विकास निधीतून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. मागील कांही महिन्यांपासून नागरीकांना बऱ्याच अंतराने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. सोबतच पाणी दुषित स्वरुपाचे आहे अशाही तक्रारी होत्या. यावर बैठकीत चर्चा झाली. सध्या त्या परिस्थितीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहराला दररोज पिण्याच्या पाणी पुरवठा व्हावा यासाठीच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. शहरात सुरु असलेल्या विकास कामांमधील काही कामे झाल्यानंतर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल असे यावेळी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले.
