नांदेड (प्रतिनिधी)- सद्गुरु ओशो यांचा पुणे येथे असणारा आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. ओशोंचा वारसा, समाधी वाचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रीय होण्याची गरज असल्याचे ओशो आश्रमाचे प्रमुख स्वामी गोपाल भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेड येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना स्वामी गोपाल भारती म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करुन जगभरातील ओशोप्रेमींना यांचे पुणे येथील ओशो आश्रम पुन्हा परत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा. ११ डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात ११००० होर्डीग्स उभारले जातील. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा वारसा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे. ओशोंनी भारताच्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या अध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवन देण्याचे काम केले असून ओशोंची समाधी ओशो सन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीना एवढीच प्रिय आहे. आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित केलेले आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे. हे कारस्थान यासाठी रचले जात आहे कि, येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे. ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेली ग्रंथसंपदा या सर्वाची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नसून या सर्व प्रकाराची सी.बी.आय व इ.डी.मार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी, अशी आहे. संपूर्ण भारताला जागवण्यासाठी ठिकठिकाणी विविध शहरात होर्डिंग लावले जात आहेत. नांदेड शहरात एक होर्डिंग निळा रोड व दुसरे होर्डिंग गोवर्धन घाट रोड येथे लावण्यात आलेले आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.
या पत्रकार परिषदेस ओशो ध्यान शिबिर संचालक सुरेश धुत उर्फ स्वामी आनंद सुरेश, ओशो ब्लेसिंग मेडिटेशन कम्यूनचे मुख्य प्रवर्तक स्वामी प्रेम प्रशांत, प्रेम सुगंधा, कम्युनचे सचिव प्रा.महेंद्र देशमुख उर्फ स्वामी गुरुमुख भारती,प्रवक्ते प्रा.डॉ.अजय गव्हाणे उर्फ स्वामी बोधी जागरण,ओशो प्रेमी सुरेश जोंधळे, मा निरंजना आदींची उपस्थिती होती.