नांदेड(प्रतिनिधी)-भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिनाचा वर्धापण समारोह कसा साजरा करावा याबद्दल महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासनाचे उपसचिव उमेश मदन यांनी एक शासन निर्णय आपल्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित केला आहे.
15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. 4 जून 2021 रोजी जारी केलेल्या ब्रेक-द-चेन अंतर्गत विविध पध्दतीनुसार हा स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे मार्गदर्शन या परिपत्रकात लिहिले आहे. यात राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा, उपविभाग, तालुका मुख्यालय तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करावा. विभागीय आयुक्त पुणे, नागपुर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोकण यांनी आप-आपल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती सोय करायची आहे.
राज्याचा मुख्य शासकीय कार्याक्रम मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल महोदय ध्वजारोहण करतील. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधीत पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता करण्यात यावा. त्या ठिकाणी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही. एखाद्या कार्यालयाला किंवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करायचा असेल तर तो सकाळी 8.35 वाजेच्यापुर्वी किंवा 9.35 वाजेनंतर करण्यात यावा. राष्ट्रध्वजाला वंदन करतांना जन गण मन हे राष्ट्रगित वाजविण्यात यावे. सलामीच्यावेळी सज्ज असलेला बॅंड सलामीपुर्वी व सलामीनंतर वाजवावा.
यावेळी होणाऱ्या भाषणांचा विषय स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारा असावा. देशाची एकता व अखंडता यासाठी कार्यकरण्यास प्रेरणा मिळेल असा असावा. ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री कांही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाही तर विभागीय आयुक्त, जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील तसेच कोरोना योध्दा डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यासह आजारावर मात केलेल्या कांही नागरीकांना निमंत्रित करावे.
स्वातंत्र्य दिन साजरा करतांना कोरोना नियमावली पाळायची आहे. नागरीकांना हा सोहळा घर बसल्या पाहता यावा याची सोय करावी. ज्या ठिकाणी विभागीय आयुक्त आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची गरज नाही. कोरोना पार्श्र्वभूमीवर 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करतांना सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे असे या शासन निर्णयात लिहिले आहे. हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202107301442070807 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
असा साजरा करा 74 वा भारतीय स्वातंत्र्यदिन