नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची मजा असलेल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी केले.
आज दि.31 जुलै रोजी दोन पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार आपला सेवा कार्यकाळ पुर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्याशी संवाद साधतांना निलेश मोरे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, सहाय्यक पोलीस निरिक्षक कल्याण विभाग शिवप्रकाश मुळे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलतांना निलेश मोरे म्हणाले आपल्या जीवनाची सुरूवात करतांना तुम्ही पोलीस नोकरी पत्कारली. पोलीस विभाग हा शिस्त ठेवणारा विभाग असल्याने आपल्या मनासारखे जीवन जगायला अवघड झाले. आज मी सुध्दा त्याच परिस्थितीतुन जगतो आहे. आज तुम्हा सर्वांची सेवानिवृत्ती झाली. म्हणजे कोणताही साहेब तुम्हाला रागवणार नाही आणि कोणताही तुमचा मातहत तुमचे ऐकणार नाही असे दु:ख समाप्त झाले आहे. त्यामुळे आपण आणि आपले कुटूंबिय यांच्यासोबत आपल्या मनाप्रमाणे जगण्याची संधी आपणास उपलब्ध झाली आहे. त्या संधीचा भरपूर फायदा घ्या आणि भविष्यातील अडचणीसाठी मी आणि माझे सर्व पोलीस बांधव तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार राहु असे वचन निलेश मोरे यांनी सेवानिवृत्त पोलीसांना दिले.
आज दि.31 जुलै रोजी सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक किशोर मक्काजी राठोड, शेख जियाउल हक मोहम्मद सुलेमान शेख, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बन्सी दावडा आडे, नारायण कामाजी हाळदे, सुभाष पांडूरंग कदम, अरुण काळुराम चौहाण, पोलीस हवालदार अहेमद खान मोझुम खान पठाण, धर्मा फुलसिंग राठोड असे आहेत. या सर्व सेवानिवृतांना सन्मान करतांना पोलीस विभागाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी परिश्रम घेतले.