नांदेड(प्रतिनिधी)-गावा-गावात ऑप्टीकल फायबर टाकण्याच्या करार करून कर्नाटक येथील एका कंपनीने 25 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा देगलूर पोलीसांनी दाखल केला आहे.
तानाजी विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डीटेक्ट ईलेक्ट्रीकल सिस्टीम प्रा.लि.औरंगाबाद यांच्याकडून रणजित किशन पवार रा.गणीहार जि.विजापुर कर्नाटक या माणसाने देगलूर तालुक्यात विविध गावांमध्ये ऑप्टीकल फायबर टाकण्याचे काम घेतले. त्यात करोडो रुपयांचा हिशोब या एफआयआरमध्ये लिहिलेला आहे. या करोडो रुपयांमध्ये 25 लाख 50 हजार रुपये किंमतीचे हे ऑप्टीकल फायबर साहित्य रणजित किशन पवारने स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याची तक्रार या एफआयआरमध्ये लिहिलेली आहे. हा प्रकार 2 फेबु्रवारी 2019 ते मार्च 2021 दरम्यान घडलेला आहे. हा गुन्हा 3 ऑगस्ट 2021 रोजी तक्रार दिल्यानंतर दाखल झाला आहे. देगलूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 408 नुसार गुन्हा क्रमांक 348/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाकीकोरे हे करीत आहेत.
ऑप्टीकल फायबर टाकणाऱ्या एकाने 25 लाख 50 हजारांचा अपहार केला