नांदेड (प्रतिनिधी)- औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापिठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी तब्बल 17 वर्षे चाललेल्या नामांतर लढ्यातील शहिदांचे स्मारक नांदेड येथे उभारण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी येत्या 12 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये रिपब्लिकन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मोर्चाचे संयोजक प्राध्यापक डॉ. राजू सोनसळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला देण्यात यावे या मागणीसाठी तब्बल 17 वर्ष संघर्ष करण्यात आला. केवळ नामांतरासाठी 17 वर्षे सुरु राहिलेला हा लढा जगातील एकमेव लढा होता. नामांतर लढ्यात अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले तर अनेक जण शहीद झाले.नामांतरासाठी जे शहीद झाले अशा शहीदांचे नांदेड येथे स्मारक उभारण्यात यावे . जयभीम नगर येथे हे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे . याशिवाय नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील बौद्ध बहुजन अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये भौतिक मूलभूत सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे विस्तारीकरण करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे . महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. विश्वशांतीदुत तथागत गौतम बुद्धाची मूर्ती नांदेड शहरात उभारण्यात यावी .यासह श्रावस्ती नगर, जयभीम नगर आणि आंबेडकर नगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने दवाखाना सुरू करण्यात यावा. नवीन श्रावस्तीनगरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि नवीन श्रावस्तीनगरातील नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी येत्या 12 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोर्चाचे संयोजक तथा युवा नेते प्राध्यापक राजू सोनसळे यांनी केले आहे.