नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निवेदन सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे यांनी ना.उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
लातूर येथील स्वारातीमचे सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे यांनी ना.उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भ्रष्टाचाराची खाण बनले आहे. येथे शिकणारा विद्यार्थी हा शिक्षणातूनच हद्दपार होईल. सिनेट सदस्य म्हणून मी हे पाप पाहु शकणार नाही असे निवेदनात लिहिले आहे. मी आपल्याकडे देत असलेले निवेदन पुर्णपणे सत्य असून ते सिध्द झाले नाही तर मी सिनेट पदाचा राजीनामा आपल्याकडे सादर करील असे प्रा.सुरज दामरे यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे.
प्रा.दामरे यांनी आपल्या निवेदनात वेगवेगळे दहा मुद्दे लिहिलेले आहेत. त्यात डॉ.उध्दव भोसले हे कुलगुरू झाल्यापासून विद्यापिठात प्लेसमेंट झाली नाही. उलट प्लेसमेंट अधिकारी हे पदच काढून टाकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काम मिळणे अवघड झाले आहे. नॅक चा दर्जा अ वरून ब वर घसरला. यावरून विद्यापीठाची वाटचाल कशी आहे ते दिसते. नॅक समितीची भेट या नावाखाली तातडीची खरेदी बिना निविदा आणि बिना दरपत्रक करण्यात आली. त्याचा एकूण खर्च तीन कोटी रुपये आहे. विद्यापिठ कायद्याच्या कलम 8 नुसार विद्यापिठाने स्थापन केलेली समिती विद्यापीठाची आहे याचा कांही एक पुरावा नाही. ही कंपनी एक स्वतंत्र कंपनी असून त्याचे संचालक यांनी आपला खाजगी पत्ता लिहिला आहे. या कंपनीला शासनाने 25 लाख रुपये दिले आहेत. या संदर्भाचा ऑडीटमध्ये उल्लेख नाही. शासनाची दिशाभूल करून हे 25 लाख रुपये हडप करण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांनी विद्यार्थ्याचे वेळापत्रक हे सकाळी 10 वाजेपासून होते ते सकाळी 7 वाजेपासून केले. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली. कोविड प्रयोग शाळा साहित्य जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत करून 1 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. विद्यापिठाचा स्वतंत्र कायदा व स्वतंत्र खरेदी नियम असतांना जाणून बुजून आर्थिक फेरफार केला आहे. मागील तिन वर्षात रुसा या योजनेतील एक रुपया खर्च केला नाही. त्यामुळे 569 लाख रुपये परत पाठवावे लागले आहेत. एमजीएम अभियांत्रिकी विद्यालय विद्यापीठाशी सलग्न नसतांना देखील तेथे संशोधन केंद्र देण्यात आले . कारण कुलगुरू उध्दव भोसले त्या ठिकाणी नोकरीला होते. प्रत्येक खरेदी बिना जीएसटी, बिना निविदा आणि बिना कोटेशन करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. पीएचडी लॉयब्ररीमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करून प्रवेश दिला. या सर्व मुद्यांची चौकशी व्हावी व दोषींना शिक्षा करावी असे प्रा.सुरज दामरे यांनी दिलेल्या निवेदनात लिहिलेले आहे.
स्वारातीम विद्यापीठ भ्रष्टाचाराची खाण झाले आहे-प्रा.सुरज दामरे यांचे उदय सामंत यांना निवेदन