नांदेड(प्रतिनिधी)-तुझ्या मुलाला कॅनडात नोकरी लावून देतो असे सांगून तिच्याकडून टप्या-टप्याने 30 लाख 75 हजार रुपये उकळणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळ कळंबोली नवी मुंबई येथील जगदीपकौर हरपालसिंघ संधू या गृहीणी नांदेडच्या लंगर साहिबजवळ राहतात.लंगर साहिब येथे सेवा करतांना त्यांच्या झालेल्या ओळखीतून त्यांनी आपल्या मुलाला कॅनडात नोकरी लावण्यासाठी कांही लोकांना सांगितले. तेंव्हा रणजितसिंघ बलदेवसिंघ, दिव्या शर्मा आणि कुलवंत कौर या तिघांनी जगदिपकौर संधू यांच्या मुलाला कॅनडात नोकरी लावून देतो असे सांगितले. मुलाच्या बनावट व खोटा पासपोर्ट तसेच बनावट व्हिसा बनविण्यात आला. आपण कंबोडीया या देशाच्या माध्यमातून गेलो तर खर्च कमी येतो असे या ठकांनी सांगितले. दरम्यान 8 ऑगस्ट 2019 ते 20 ऑगस्ट 2019 दरम्यान जगदिपकौर संधूकडून टप्याटप्याने 30 लाख 75 हजार रुपये या ठकसेनंानी घेतले. तिकडे त्या मुलाला कंबोडीया मार्गे नेण्यात आले तेंव्हा कंबोडीया प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. कारण त्यांचा पासपोर्ट व व्हिसा बनावट होता. त्यानंतर या ठकसेनांनी त्या मुलाला परत नांदेडला आणून सोडले. आपले काम झाले नाही. तेव्हा जगदिपकौरने पैसे परत मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीवरून वजिराबाद पोलीसांनी रणजितसिंघ बलदेवसिंघ, दिव्या शर्मा, कुलवंत कौर या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 507, 34 नुसार गुन्हा क्रमांक 281/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
कॅनडात नोकरीचे आमीष दाखवून 31 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल