नांदेड (प्रतिनिधी)-मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 17 वर्ष चाललेल्या नामांतर लढ्यात शहीद झालेल्या व्यक्तीचे स्मारक नांदेड येथे उभारण्यात यावे या मागणीसह आज रिपब्लिकन महामोर्चा कृती समितीने मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे यासाठी आंदोलन 17 वर्ष चालले. त्यात अनेकजण शहीद झाले. अनेक लोकांची घरे उदध्वस्त झाली आणि नामांतर लढा एैतिहासिक ठरला. या पार्श्वभूमीवर जयभिमनगर नांदेड येथे शहिदांचे एक भव्य स्मारक उभारण्यात यावे, नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील बौध्द, बहुजन आणि अल्पसंख्यंाक वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे विस्तारीकरण करुन तो परिसर सुशोभित करावा. महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे. तथागत गौतम बुध्दांची भव्य मूर्ती नांदेड शहरात उभारण्यात यावी यासह अनेक मागण्या रिपब्लिकन मोर्चा कृती समितीने मनपा आयुक्तांना दिल्या. या निवेदनावर प्रा.राजू सोनसळे , कॉ.गंगाधर गायकवाड ,ऍड.यशोनिल मोगले, विशाल एडके, संदीप मांजरमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
