नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय महिलेचा वजिराबाद ते शिवमंदिर चैतन्यनगर पर्यंत पाठलाग करून तिला “चिठ्ठी’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलीसांनी अटक केली.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 30 वर्षीय महिला नागपंचमी, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजेच्यासुमारास वजिराबाद भागात आली. त्यांना डॉक्टरकडे उपचार करायचा होता पण डॉक्टर नसल्यामुळे त्या किंग कलेक्शन जवळच्या मार्केटमध्ये कांही खरेदी करून पायी परत जात असतांना एम.एच.26 बी.एम.3921 या दुचाकीवर दोन 35 ते 40 वयोगटातील व्यक्ती त्यांचा पाठलाग करून त्यांच्या समोर जावून पुन्हा मागे-मागे पाहत होते. त्यांचा उद्देश वाईट होता. एस.पी.ऑफिसमोरून ह्या महिला ऍटोत बसल्या आणि श्रीनगर येथे उतरल्या. तेथे सुध्दा हे दोघे मागे आले आणि त्यांना “चिठ्ठी’ देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्या महिला ऍटोमध्ये बसून शिवमंदिर चैतन्यनगर येथे पोहचल्या. तेथे सुध्दा या दोघांनी चिठ्ठी देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या ठिकाणी पोलीस अंमलदार होता. त्या महिलेने त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्या दोघांना पोलीस ठाणे विमानतळ येथे नेण्यात आले.
“चिठ्ठी’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे सुशिल लक्ष्मीकांत जोशी (40) रा.गुजराथी हायस्कुलजवळ वजिराबाद नांदेड आणि किरण किशोर सुरतवाला (40) रा.सोमेश कॉलनी नांदेड अशी आहेत. त्यातील एक व्यक्ती माफी मागत होता पण त्या महिलेने त्यांना क्षमा केले नाही. या प्रकरणाला मिटविण्यासाठी अनेक मंडळी आले होते. पण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती. महिलेच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 258/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(ड) आणि 34 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार व्ही.के.खंदारे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
30 वर्षीय महिलेला “चिठ्ठी’ देणाऱ्या दोघांना अटक