पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या नागरीकांना शुभकामना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे श्री गुरू गोविंदसिंघजी रुग्णालय आता श्रेणी वाढ होणार असून त्या ठिकाणी 300 खाटांचे रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी तयार केले जाणार असल्याची घोषणा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
आज 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करतांना अशोक चव्हाण बोलत होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व विभागांचे प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरीक उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधानाला मारक ठरणारी प्रवृत्ती तयार झाली आहे. पण त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने विकास थांबत नसतो. त्यामुळे ईतिहास आणि सत्य बदलणार नाही. महात्मा गांधीचा अंहिसेचा मुलमंत्र भारतानेच नव्हे तर जगाने स्विकारलेला आहे. आजचे स्वातंत्र्य दिनाचे 75 वे वर्ष आहे. अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात देशाच्या प्रति प्रेम तयार करणारे अनेक कार्यक्रम होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सुध्दा असे कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
वेगवेगळे विषाणू आपल्यावर हल्ला करत आहेत त्यासाठी मास्क, सॅनेटायझर आणि शारिरीक अंतर या त्रिसुत्रीचे पालन नागरीकांनी करावे असे आवाहन मी करतो आहे असे अशोक चव्हाण म्हणाले. तिसरी लाट येण्याची भिती अजून कायम आहे. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजनाच त्यावर खरा उपचार आहे. नांदेड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मी आज घोषणा करतांना मला आनंद आहे की, नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी रुग्णालयाच्या श्रेणीत वाढ करून त्या ठिकाणी 300 खाटा उपलब्ध होणार आहेत. सोबतच नवीन वैद्यकीय सुविधांची सोय नांदेडला व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. कर्करोग उपचारासाठी सुध्दा नांदेडला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी नांदेडमध्ये साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना करणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी 75 कोटी रुपये खर्च येणार आहे. हृदयरोगावर उपचार करण्यासाठी नांदेड येथे कार्डीयाक हॉस्पीटल उभारणार आहोत त्यासाठी 12 कोटी रुपये खर्च येणार आहे. भोकरच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी सुध्दा वाढविण्यात येणार असून त्या ठिकाणी आता उपजिल्हा रुग्णालय होईल आणि तेथे 100 खाटांची सोय करण्यात येणार आहे. या माध्यमाने नांदेड जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी जे-जे उपाय करण्याची गरज आहे ते सर्व करण्यासाठी मी संकल्प घेत आहे.
आपण सध्या रोगांशी लढत आहोत पण त्यातून विकासाची कामे थांबणार नाहीत यावर लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने आपली ही जबाबदारी योग्य रितीने सांभाळली याचा मला आनंद आहे. आर्थिक स्त्रोत कमी झाले असतांना सुध्दा मला नांदेड जिल्ह्यासाठी बरेच कांही करता आले याचा आनंद आहे. प्रशासकीय सुविधा असतील, शेतीची कामे असतील यामध्ये नांदेड जिल्ह्याचा आलेख उंचावणारा आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात नुकसान झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशिल आहे. 75 व्या अमृतमहोत्सवीनिमित्ताने मी सर्वांना शुभकामना देतो.
या कार्यक्रमात कोरोना काळात भरिव कामगिरी करणऱ्या अनेकांचा सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्राप्त करणारे पोलीस अंमलदार दिगंबर पाटील, अंबादास जोशी, चंद्रकांत पुलकुंठवार, धोंडीबा भुते, पांडूरंग माने, बालाजी कोंढावार, संतोष वच्छेवार, शेख इकबाल, सचिन खेडकर आणि कैलास राठोड यांचाही पालकमंत्र्यांनी सन्मान केला.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मास्क नव्हता
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उदबोधनात मास्क लावण्यासाठी नागरीकांना आवाहन केले. 13 ऑगस्ट रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी बे्रक द चेन या संदर्भात नवीन आदेश काढतांना त्यात सुध्दा मास्क वापरण्याची सुचना आहे. पण आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात खुद्द डॉ.विपीन यांनीच मास्क परिधान केला नव्हता.