नांदेड(प्रतिनिधी)-दि.20 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या मुक आंदोलन संदर्भाने नांदेड शहराच्या वाहतुक मार्गामध्ये बराच बदल केल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.
उद्या दि.20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत मराठा समाजाचा मराठा क्रांतीच्यावतीने आंदोलन होणार आहे. या आंदोलनात हजारोच्या संख्येत लोक उपस्थित राहतील म्हणून वाहतुकीला अडचणी येवू नयेत, सर्वसामान्य जनतेसाठी रस्ते सहज उपलब्ध असावेत या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस दलाने कांही मार्गांच्या वाहतुकीमध्ये वळण रस्ते देवून एक दिवसासाठी तात्पुर्त्या स्वरुपात वाहतुक व्यवस्थेत बदल केला आहे.
बंद असलेले मार्ग
वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महत्मा गांधी पुतळ्यापासून ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. या रस्त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्ग मिळेल. रेल्वे स्टेशन चौक ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गामध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी यांना मार्ग मिळेल. न्यायालयाच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत येणारा रस्ता. जिल्हा परिषदेच्या बाजूने येणारा रस्ता. न्यायालयाकडे आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा रस्ता बंद राहिली.
सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने रेल्वे स्टेशनकडे जाण्या-येण्यासाठी कलामंदिर जवळील बिकानेअर बेकरीजवळून डॉक्टर्सलेन रस्त्याचा वापर करावा. वजिराबाद चौक ते जुना मोंढा हा रस्ता दुतर्फी वाहतुक करता येईल. नागरीकांनी चिखलवाडी, गुरूद्वाराकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात येण्या-जाण्यासाठी वजिराबाद चौक ते गांधी पुतळा मार्गाचा वापर करावा. जिल्हा परिषदेत जाण्या-येण्यासाठी डॉक्टर्सलेनमधून असलेल्या रस्त्याचा वापर करावा.
मराठा क्रांती मुक आंदोलननिमित्त वाहतुक मार्गांमध्ये बदल