नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने आज दोन युवकांकडून दोन बनावटी, गावठी प्रकारचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मागील 20 महिन्यांमध्ये आजपर्यंत 52 पिस्तूले जप्त केली आहेत. मागील 20 वर्षांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत पिस्तूल पकडण्याचा अभिलेख नाही.
नांदेडमध्ये बाहेर राज्यातून पिस्तूल आणले जातात आणि त्यांची विक्री होते. त्या पिस्तुलांच्या आधारावर अनेकांनी नांदेडमध्ये गोळीबार घडवला, लुट केली, खून केले. या परिस्थितीला सामोरे जाताना 24 डिसेंबर 2019 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी भरपूर मेहनत घेतली. आपल्या 20 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी 50 पिस्तुले जप्त केली आहेत. नांदेडच्या नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्यासाठी त्यांनी केलेल्या या प्रयत्नांना पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिलेल्या पाठबळामुळे द्वारकादास चिखलीकर यांना पिस्तुल पकडून भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे दाखल करता आले.
आज दि. 26 ऑगस्ट रोजी द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंबिका मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ज्ञानेश्वर नगर येथे दोन युवकांकडे पिस्टल आहे म्हणून चिखलीकर यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संग्राम केंद्रे, अफजल पठाण, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, गजानन बैनवाड, बालाजी यादगीरवाड, बजरंग बोडके, राज बन्सी, अर्जुन शिंदे यांना तिकडे पाठविले.
ज्ञानेश्वर नगर मध्ये या पथकाने गणेश बालाजी सिद्दलवाड (21) रा. भोसी ता. भोकर आणि सचिन परमेश्वर शिंदे (20) रा. आष्टी ता. हदगाव या दोघांना पकडले. यातील गणेश सिद्दलवाडच्या कंबरेला लावलेले एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे तसेच सचिन शिंदेच्या जवळ एक बनावटी पिस्टल सापडले. या ऐवजाची किंमत 41 हजार 200 रूपये आहे. या संदर्भाने वृत्त लिहीपर्यंत भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
मागील आठ महिन्यांपासून नांदेडमध्ये आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कामगिरी काहीच केली नाही, पण पोलिसांवर विविध प्रकारे दबाव आणण्याचा सुरू केलेला प्रयत्न चिखलीकरांच्या कामगिरीने आज पुन्हा एकदा फसला आहे. 20 महिन्यांत 52 पिस्टल पकडणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्यातील दम या कारवाईने आज पुन्हा एकदा दाखवला आहे. त्यांनी मागे सुद्धा गोळीबार करून खून करणाऱ्या गॅंगमधील 9 जणांना एकाच दिवशी पकडण्याची कार्यवाही केली. सोबतच एक वर्षापुर्वीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सुद्धा त्यांनीच पकडले.