पोलिसांना वेतनाची अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करता येत नाही
नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस अंमलदार ज्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या पोलिसांना वेतन रक्कमेची अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करण्यात येऊ नये असे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेने सन 2018 मध्ये आस्थापना शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार वटकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत करण्यात आलेले आहेत. राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या आदेशाकडे लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे.
राज्य पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, आगाऊ वेतनवाढी, मानीव तारीख दिल्यानंतर वेतन निश्चिती करण्यात येते. त्यास वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदविल्यास त्याची सुधारीत वेतन निश्चिती होते. सुधारीत वेतन निश्चिती केल्यानंतर अतिप्रदान झालेली वेतनाची रक्कम पोलीस खात्यातील कर्मचारी सेवेत असताना किंवा सेवानिवृत्ती झाल्यावर त्यांच्याकडून वसूल करण्यात येत होती.
याबाबत अनेक पोलीस अंमलदारांनी उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे याचिका दाखल केल्या. त्यात शासनास मार्गदर्शन करावे अशी मागणी केली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील रिठ याचिका क्र. 615/2016 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार तसेच शासनाच्या विधी व न्याय विभागाच्यावतीने व्यक्त केलेल्या अभिप्रायात नमुद केल्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील दिवाणी अपिल क्र. 11527/2014 (11684/2021) तसेच पंजाब आणि इतर उच्च न्यायालयामधील निर्णयांच्या आधारे दिलेल्या आदेशानुसार अतिप्रदान झालेल्या रक्कमेची वसुली पोलीस अंमलदारांकडून करता येणार आहे.
सन 2018 मध्ये पारीत झालेले हे आदेश आजही बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माहीत नाही. या आदेशात राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांनी ही वसुली करू नये असे लिहिलेले आहे. काळाच्या ओघात हा आदेश पडद्यामागे गेला असेल तरी पण सर्वांना याची माहिती राहावी म्हणून आम्ही हा आदेश पुन्हा एकदा प्रसिद्ध केला आहे. राज्यभरातील सर्व पोलिसांनी या बातमीत लिहिलेल्या विविध न्यायालयीन प्रकरणांनुसार अर्ज करून आपल्याकडून होणारी अतिप्रदान रक्कमेची वसूली करू नये अशी मागणी करता येईल. पोलीस महासंचालक कार्यालयाचा या आदेशाचा क्रमांक पोमस/6/अतिप्रदान वसुली/110/2017 दि. 05/09/2018 असा आहे.
पोलीस अंमलदारांनो हे माहित आहे काय..?