नांदेड,(प्रतिनिधी)- भाऊराव कारखान्याने गतवर्षीच्या गाळप हंगामातील राहिलेले सातशे रुपये देण्याऐवजी केवळ तीनशे रुपये प्रति टन बिले काढून शेतकऱ्यांचा भ्रनिरास केला. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विकलेल्या दोन कारखान्यांचा हिशोब देण्याऐवजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात बुलेट ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत
शेतक-यांसाठी बुलेट ट्रेन’ समृद्धी महामार्ग हे महत्त्वाचे नसून त्यांच्या घामाचे, कष्टाचे पैसे नियमानुसार वेळेवर मिळणे जास्त महत्त्वाचे असल्याने सांगून पालकमंत्रीच नियम मोडणाऱ्या कारखान्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे गतवर्षी गाळप केलेल्या उसाची प्रतिटन सातशे रुपये बाकी असल्याने स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होणार होते परंतु पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बैठक घेऊन राहिलेले पूर्ण पैसे एकरकमी देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. प्रतिटन सातशे रुपये पैकी केवळ तीनशे रुपये नुसार बिले काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कारखाना प्रशासनाने केले आहे. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्री व कारखान्याने विकलेल्या दोन कारखान्याच्या हिशोब देऊन राहिलेली पूर्ण रक्कम एका टप्प्यात देणे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनाच्या मूळ विषयाला बगल देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले .नांदेड जिल्ह्यात बुलेट ट्रेन आणण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे अभिमानाने सांगत पालकमंत्र्यांनी मूळ विषयाला बगल देऊन शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास केला. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन ,विमानसेवा ह्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या नसून त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य व वेळेवर पैसे मिळावे यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे ही माफक अपेक्षा शेतकऱ्यांना आहे . पालकमंत्र्यांची ही कृती म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना वाटत आहे साहेब मोठे साहेब आपले साहेब चांगले पण वेळेवर शेतकऱ्यांना पैसे देत नसल्याने आपल्या काय कामाचे अशी भावना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच्या मनात तयार होत आहे. ही धोक्याची घंटा पालकमंत्र्यांनी ओळखावी अन्यथा लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती येणा-या काळात शेतकरी करतील असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे .