नांदेड(प्रतिनिधी)-कोविड 19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या उत्सवात गणेश मंडळांमार्फत कोविड लसीकरण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिले आहेत.
यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करायचा आहे. त्यासाठी शासनाने निर्देश जारी केले आहेत. गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी कोरोना, मलेरिया, टेंगू आदी आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करावी असे निर्देश दिले आहेत. सोबतच विविध गणेशमंडळांमार्फत कोविड लसीकरण आयोजन करावे त्यात महानगरपालिका क्षेत्रात आणि गाव पातळीवर कोवीड लसीकरण आयोजन करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून लस साठा उपलब्ध करून घ्यायचा आहे.
महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी मनपा, पोलीस निरीक्षक, नगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी नगरपालिका, संबंधीत पोलीस निरीक्षक आणि गावपातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने लसीकरण शिबिर आयोजीत करायचे आहे. गणेश उत्सवादरम्यान मोठ्या गणेश मंडळांनी 18 वर्षांवरील किमान 1100 लोकांचे लसीकरण करावे. लसीकरणाच्या मागणीनुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लसी उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि गणेश उत्सवादरम्यान झालेल्या लसीकरणाचा दररोजचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा आहे, असे या आदेशात लिहिले आहे.
गणेश उत्सवादरम्यान कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करा-डॉ.विपीन