मारेकऱ्याला पाच दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-30 जुलै रोजी इज्जतगाव बर्डी शिवारात नदी सापडलेल्या एका 21 वर्षीय युवकाचा मृतदेह तपासामध्ये खून असल्याचे उघड झाले. उमरी पोलीसांनी मारेकऱ्याला पकडल्यानंतर उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.धपाटे यांनी मारेकऱ्याला 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.30 जुलै 2021 रोजी सकाळी देगावचाळ नांदेड येथील गौतम राहुल पंडीत (वय 21) हा युवक घरून गेल्यानंतर परत आलाच नाही. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात राहुलचे मामा मिलिंद दिनाजी शिराढोणकर यांनी मिसिंग दाखल केली होती. 3 ऑगस्ट रोजी इज्जतगाव बर्डी ता.उमरी येथील गोदावरी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह सापडला. याबाबत चौकशी केली असता तो मिलिंद दिनाजी शिराढोणकर यांचा भाचा गौतम राहुल पंडीत हा असल्याचे कळले. त्याबाबत उमरी पोलीसांनी अकास्मात मृत्यू क्रमांक 29/2021 दाखल केला होता. याबाबत तपास झाला तेंव्हा धक्कादायक बाब समोर आली.
गौतम राहुल पंडीत हा 30 जुलै रोजी देगावचाळ नांदेड येथून ऍटो चालक मनोहर केरबा वाघमारे सोबत गेला होता. मनोहरला गौतमने 60 हजार रुपये उसने दिले होते आणि ते परत करण्याच्या कारणावरून वाद झाला. तेंव्हा मनोहर वाघमारेने गौतम पंडीतला पोहता येत नाही हे माहित असतांना इज्जतगाव बर्डी शिवारातील गोदावरी नदी पात्रात त्याला ढकलून त्याची हत्या केली. या तपासानंतर उमरी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 189/2021 कलम 302 आणि 209 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या खून प्रकरणात मनोहर केरबा वाघमारेला अटक झाल्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी न्यायालयाकडे केली. न्या.एस.एस.धपाटे यांनी मनोहर वाघमारेला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
उमरी येथे नदीपात्रात मयत सापडलेल्या युवकाचा खून झाला होता