नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या परिस्थितीत विष्णुपूरी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे संत दासगणु पुलाच्या छताला पाणी लागत आहे. महानगरपालिकेने 20 नदीघाटांवर 20 जीवरक्षक तैनात केले आहेत. जनतेने दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मागील कांही दिवसांपासून पावसााने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. खरीप पिकांनाही बऱ्याच ठिकाणी नुकसान होत आहे. गोदावरी नदी पात्रातील पाणलोट क्षेत्रांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक 2696 क्युमेक्स आहे. त्यामुळे तेवढाच पाणी साठा, 2696 क्युमेक्स (95207 क्युसेक्स) पाणी विष्णुपूरी धरणातून बाहेर सोडण्यासाठी 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे दुपारी 3 वाजेच्यासुमारास शहरातील नावघाट येथे असलेल्या संत दासगणु पुलाच्या छताला पाणी जवळपास टेकले आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्यामुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आज नदी घाटांची पाहणी केली. त्यात उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी नदीघाटांवर केले होते.एकूण 20 नदीघाटांवर मनपा प्रशासनाने 20 जीवरक्षक तैनात केले आहेत. प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, पाण्याचा येवा ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक आहे. म्हणून नदी काठी राहणाऱ्या अत्यंत दक्ष आणि सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन आपल्या परी सर्व तयारी करीत आहे. पण जनतेने सुध्दा पाण्याच्या विसर्गाला ग्रहीत धरुन स्वत:पण दक्ष राहावे असे कळविले आहे.