नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालय परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी गाडी वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 24 तासात पकडली. दोन चोरट्यांना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
दि.9 सप्टेंबर 2021 रोजी हडसणी ता.हदगाव येथील गजानन शिवाजी सुर्यवंशी हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर. 7391 घेवून नांदेड न्यायालयात कामासाठी आले होते. त्यांनी आपली दुचाकी गाडी न्यायालयातील उपहारगृहासमोर उभी केली होती. आपले काम संपवून परत आले तेंव्हा 45 हजार रुपये किंमतीची गाडी कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत 10 सप्टेंबर रोजी त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 314/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार उतकर यांच्याकडे देण्यात आला.
या गुन्ह्याबाबत माहिती घेतांना गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवार, चंद्रकांत बिरादार, शेख इमरान असे सर्व आज दि.11 सप्टेंबर रोजी गस्त करत असतांना एका दुचाकीवर दोन संशयीत माणसे त्यांना दिसली. त्यांनी थांबवून त्यांची विचारणा केली असता त्यांची नावे बालाजी गणेश वाघमारे (19) रा.फुलेनगर नांदेड आणि विजय उर्फ शत्रुघ्न लक्ष्मण पारवे (22) रा.आंबेडकरनगर नांदेड अशी आहेत. यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.7391 जप्त करण्यात आली. आज या दोन्ही चोरट्यांना मुख्य न्यायादंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविून दिले आहे.
अत्यंत कमी वेळेत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेर बंद करणाऱ्या वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी कौतुक केले आहे.