नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई येथील साकीनाका येथील महिलेवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रा. राजू सोनसळे यांनी केली.
मुंबईतील साकीनाका येथे एका मागासवर्गीय महिलेवर झालेला पाशवी अत्याचार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पिडीत महिलेचे घर पाडल्यानंतर तिच्या घराची जागा बळकवणाऱ्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुंबई प्रशासनाने योग्य वेळी कार्यवाही केली असती तर साकीनाका प्रकरणातील त्या महिलेचा बळी गेला नसता परंतु गुंडगिरीला पाठबळ देणाऱ्या प्रशासनावर पिडीतेवर अत्याचार झाला. त्यामुळे या प्रकरणातील दोषी आरोपींना फाशी शिक्षा देतांना पिडित महिलेला बेघर होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधीतावर कठोर गुन्हे दाखल करावे. शिवाय नांदेड जिल्हयातील भोकर येथील बलात्कार प्रकरणात ज्यो तत्परतेने चार्जशिट न्यायालयात दाखल करण्यात आली. तीच तत्परता साकीनाका येथील प्रकरणातही प्रशासनाने दाखवावी. पिडीतेच्या दोन्ही मुलींचे शासनाने तात्काळ पुर्नवसन करावे त्यांना शासकिय नौकरीत सामावुन घ्यावे, म्हाडा योजनेतून त्यांना मोफत घर द्यावे अशी मागणी प्रा. राजू सोनसळे यांनी केली आहे.
आपल्या मागण्यांचे निवेदन प्रा. राजू सोनसळे यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. दरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्था प्रचंड बोकाळत चालली आहे. त्यामुळे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याने गुंडगिरी प्रवृत्तीला अधिक बळ मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ गुंडगिरीचा बिमोड करण्याच्या अनुषंगाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी प्रा. राजू सोनसळे यांनी केली आहे.