नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीच्या तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला 2 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
9 सप्टेंबर रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या आणि त्यांच्या भावामध्ये सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाबाबत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 145 मध्ये नमुद असलेला प्रस्ताव तयार करून तो तालुकादंडाधिकारी बिलोली यांच्या समोर सादर करण्यासाठी बिलोली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून धोडींबा नारायण कोकाटे हे 5 पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत आहेत. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी केली तेंव्हाअव्वल कारकून धोंडीबा कोकाटे यांनी पाच हजारांची लाच मागणी केली पण सोबत तडजोडीमध्ये 2 हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे कबुल केले आणि ती लाच स्विकारली. ताबडतोब लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी लाच घेणाऱ्या धोंडीबा नारायण कोकाटेला ताब्यात घेतले.बिलोली पोलीस ठाण्यात लाच घेणारा अवल कारकून धोंडीबा नारायण कोकाटे यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच घेणाऱ्या धोंडीबा नारायण कोकाटे (47) यास जेरबंद करण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील, पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद इंगोले, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, जगनाथ अंनतवार, ईश्र्वर जाधव आणि शेख मुजीब यांनी पार पाडली.