नांदेड,(प्रतिनिधी)-सार्वजनीक बांधकाम विभागाच्या गुण नियंत्रण मंडळ कार्यालयासाठी सुरू असलेल्या इमारतीच्या दुरूस्तीला वर्क ऑर्डर दिलेली नसताना जोमाने काम सुरू असून अशा वादग्रस्त ठरत असलेल्या इमारतीचे उद्घाटन बांधकाम मंत्री करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेडच्या सार्वजनीक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या कारनाम्याचा कहर सुरू आहे. अगोदर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावरही नांदेडला येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगुस घालत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच काय तर महाराष्ट्रातील सर्व अधिकार्याच्या बदल्यासह त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही त्यांच्याकडे असल्याचे बोलल्या जात आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यातील या विभागाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली करून त्यांच्या पाठीराख्यांना चांगलीच कमाई करून दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न करूनही त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.
मर्जीतील अधिकार्यांना कमाईसाठी मोठी सूट दिली असल्याचेही बोलल्या जाते. म्हणूनच मनमानीचा कळस करत कामे क्लब करून जास्त फायदा पोहोचवणार्या कंत्राटदारालाच ती कशी मिळतील अशी सोय केल्या जात असल्याची दबक्या आवाजातून काही कंत्राटदारामध्ये चर्चा ऐकावयास मिळत आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर केलेली यादी तर मोठी आहेच पण दुरूस्तीच्या नावाखाली केलेल्या शासनाची लूट थक्क करणारी असल्याचे मानल्या जात आहे.
आता हेच बघा ना, सार्वजनीक बांधकाम विभाग, नांदेड येथे गुण नियंत्रण मंडळाचे कार्यालय सूरू होणार असून अगोदर अस्तीत्वात असलेल्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी 75 लाख खर्च करण्यात येत असून विना वर्कऑर्डरच एका मर्जीतील बेरेाजगार अभियंत्याला काम देण्यात आले आहे.
खुर्चीचा गैरवापर करत सर्व नियम धाब्यावर बसवल्या जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले सध्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या दुरूस्त झालेल्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री पदावर असताना झालेली बदनामी पाहता विना वर्कऑर्डरच्या इमारतीचे उद्घाटन बांधकाम मंत्री करतील काय? याकडे लक्ष लागले आहे.
शाखा अभियंता निला यांची कबुली
सार्वजनीक बांधकाम विभाग, नांदेड येथील परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या दुरूस्तीच्या कामावर प्रत्यक्ष शाखा अभियंता निला यांना भेटून विचारणा केली असता त्यांनी वर्कऑर्डर विना काम सुरू असल्याचे सांगीतले. सदरील काम अधिक्षक अभियंता धोंडगे यांच्या मौखीक आदेशावरून सुरू असल्याचे सांगीतले. 75 लाखाचे काम मौखीक आदेशावर कसे, असे विचारले असता कार्यालयात इतर कागदपत्र असल्याचे सांगीतले. शाखा अभियंत्याच्या कबुलीनामा या विभागातील अंधाधुंदीचे प्रदर्शन दाखवत आहे.