ज्यांची पत असते त्यांची बदनामी होतांना ऐकली आहे
नांदेड(प्रतिनिधी)-पवन जगदीश बोरा यांनी 16 सप्टेंबर रोजी रात्री 8.56 वाजता संपादक कंथक सूर्यतळ आणि आरेफ खान पठाण यांनी माझी बदनामी केली असा अर्ज दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी त्याबद्दल अ दखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या बाबतचा एनसी रिपोर्ट व्हॉटसऍप संकेतस्थळावर व्हायरल केला आहे. त्यासोबत दिलेला मुळ अर्ज मात्र जोडला नाही. त्यामुळे त्यांची काय बदनामी झाली हे त्या एनसी रिपोर्टवरून कळले नाही.
दि.14 सप्टेंबर रोजी वास्तव न्युज लाईव्हने माहिती अधिकार संरक्षण समितीच्या बोगस लेटर पॅडवर वजिराबाद पोलीसांनी संपादकांविरुध्द गुन्हा दाखल केला अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीचा उगम पवन जगदीश बोरा (शर्मा) यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे दिलेल्या अर्जाची प्रत व्हॉटसऍप संकेतस्थळांवर प्रसिध्द केली होती. या पत्रात कलमे तर लिहिलेली होती. पण ती कोणत्या कायद्याची आहेत याचा उल्लेख नव्हता. सोबतच माहिती अधिकार संरक्षण समिती ही बोगस आहे असे लिहिले होते. त्यासाठी त्या बातमीमध्ये माहिती अधिकार संरक्षण समितीच्या लेटर पॅडवर असलेला नोंदणी क्रमांक एफ 0023330/एनएनडी (एमएच) वास्तव न्युज ने लिहिला होता. या क्रमांकानुसार अर्धापूर येथे जन महिती सेवा समिती नोंदणीकृत आहे.
या बाबत दैनिक चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान पठाण यांनी सांगितले होते की, मारवाडी हा शब्द जातीवाचक नसून भूवाचक आहे. राजस्थानमधील मारवाड प्रांतात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती स्वत:ला मारवाडी असे संबोधीत करतो असे लिहिले होते. हे सत्यच आहे. नांदेडमध्ये राहणाऱ्या मारवाड प्रांतातील कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला विचारणा केली तर तो स्वत:ला मारवाडी आहे असेच सांगतो. मग त्या बातमीमध्ये पवन जगदीश बोरा(शर्मा) यांची बदनामी काय झाली. ज्याचा अदखल पात्र गुन्हा वजिराबाद पोलीसांनी दाखल केला हे समजले नाही.
याच बातमीमध्ये पोलीस अभिलेखात भारतीय दंड संहितेतील समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला तर त्यात पवन बोरा उर्फ शर्मा याचे नाव पोलीस अभिलेखात आहे असे लिहिले होते. ते सुध्दा खोटे नाही. पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा क्रमांक 74/2015 दाखल आहे. ज्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 307 आणि 294 जोडलेली आहेत. या कलमांचा अर्थ आम्ही लिहिण्याची गरज नाही. पोलीस ठाणे वजिराबाद येथे याच पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा ज्यात अगोदर शर्मा होते नंतर बोरा झाले. त्यांच्या नावे गुन्हा क्रमांक 247/2008 ज्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 307 आणि 353 जोडलेली आहेत. गुन्हा क्रमांक 105/2006 या गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेची कलमे 302, 34 जोडलेली आहेत. तसेच गुन्हा क्रमांक 291 /2010 ज्यामध्ये भारतीय दंडसंहितेची कलमे 353 आणि 332 जोडलेली आहेत. यामध्ये बदनामी होण्यासारखे काय आहे. जो अभिलेख आहे तो आहे आणि तोच लिहिला आहे. याबाबत दैनिक चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान पठाणने पवन बोरा उर्फ शर्मा यांची काय बदनामी केली हे त्या एनसी रिपोर्टवरून कळत नाही.