पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जागेचा वाद आज तरी संपला

नांदेड(प्रतिनिधी)-1950 मध्ये खरेदी केलेल्या जागेवर मालकी हक्काचा निर्णय 71 वर्षांनी झाला आहे. नांदेड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि खाजगी व्यक्ती यांच्यात सुरू असलेल्या या वादाचा निर्णय पाचवे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम.बी.कुलकर्णी यांनी दिला आहे.ही जागा श्रीनगर भागातील विद्यानगरसमोर वसलेली आहे. या जागेचा आज हिशोब पाहिला तर करोडो रुपयांची ही जागा आहे.
मागील एक-दोन वर्षात श्रीनगर भागातील विद्यानगर वसाहतीसमोर एक टीनशेड उभारले गेले आणि ही जागा चर्चेत आली. याबाबत दिवाणी न्यायालयात नियमित दिवाणी खटला क्रमांक 441/2010 आणि 573/2017 सुरू होते. यामध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने अध्यक्ष डॉ.व्यंकटेश रुक्माजी काब्दे यांनी एक वाद दाखल केला होता. दुसरा वाद निर्मलाबाई नेमीचंद बाकलीवाल, जितेंद्रकुमार नेमीचंद बाकलीवाल, गणेश नेमीचंद बाकलीवाल यांच्यासह एकूण 11 वादी आहेत. त्या प्रकरणात नांदेड एज्युकेशन सोसायटी प्रतिवादी आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सांगण्याप्रमाणे गट क्रमांक, सर्व्हे नंबर 18 मौजे जंगमवाडी श्रीनगरमधील मुख्य रस्त्या लगत असलेला दोन एकर भुखंड हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक कामासाठी दिलेल्या जमीनीचा भाग आहे. या प्रकरणात बाकलीवाल कुटूंबियांच्यावतीने सादरीकरण करण्यात आले की, दि.29 फेबु्रवारी 1356 फसली अर्थात सन 1946 मध्ये तेंव्हाच्या बलदिया (आताची महानगरपालिका) ने शैक्षणिक कामासाठी 18 एकर 25 गुंठे जागा सोसायटीला दिली होती. पण त्यातील कांही भाग तसाच शिल्लक राहिला होता. तो भाग आजच्या श्रीनगर रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला लागलेला आहे. आजचा नगर भुमापन क्रमांक 7780, ज्यात 814 चौरसमिटर जागा आहे. आणि 7771 ज्यामध्ये 1098 चौरस मिटर जागा आहे. ही जागा नोंदणी खत क्रमांक 163/1950 च्या नोंदणी अभिलेखानुसार 18 फेबु्रवारी 1950 रोजी आजच्या वादी बाकलीवाल कुटूंबियातील पुर्व प्रमुख नेमीचंद बाकलीवाल यांनी रामसिंग मंगलसिंग यांच्याकडून खरेदी केली होती. याभागात रामसिंग यांची 33 एकर 13 गुंठे जागा होती.
1950 मध्ये खरेदी केलेली ही जमीन मोकळी जागा म्हणूनच पाहिली. 2010 नंतर या जागेचा वाद असल्याची बाब समोर आली. त्यातून दिवाणी वाद क्रमांक 441 आणि 573 दाखल झाले. या बाबत अंतरिम मनाई हुकूम आणि त्यानंतर कायम मनाई हुकूम अशा प्रक्रियेतून हा दिवाणी वाद सुरू होता. दोन दिवाणी वादांचा निर्णय एकत्र करून देण्यात आला. या दरम्यान या प्रकरणात 12 साक्षीदारांनी आपल्यावतीने न्यायालयासमक्ष जबाब दिले. उपलब्ध अभिलेख आणि त्याचे विश्लेषण कसे करावे याचा उल्लेख आपल्या निकालात करून न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी या दोन वादांचा निकाल देतांना पीपल्स एजुकेशन सोसायटी विरुध्द कायम मनाई हुकूम जारी केला आहे याचा अर्थ ही जागा बाकलीवाल कुटूंबियांची आहे असाच हा निर्णय झाला. या प्रकरणाचा निकाल 82 पानांमध्ये टंक लिखीत करण्यात आला आहे. या दोन वादांमध्ये बाकलीवाल कुटूंबियांच्यावतीने ऍड. समीर पाटील यांनी काम पाहिले. बाकलीवाल कुटूंबियांशिवाय आता या जागेत मालकांच्या ठिकाणी मोहम्मद अब्दुल अतिक  मोहम्मद अब्दुल वहिब, मोहम्मद अब्दुल खुसरो, मोहम्मद अब्दुल वहिद, मोहम्मद अब्दुल वजिद मोहम्मद अब्दुल वहिद, मोहम्मद अब्दुल अजिज मोहम्मद अब्दुल वहिद, शहाजिया मोहम्मद अब्दुल अतिक, वसियोद्दीन रजियोद्दीन मुजावर, स.भुपेंद्रसिंघ गेंदासिंघ कामठेकर, मोहम्मद अब्दुल अयाज, मोहम्मद अब्दुल वहिद यांचीही नावे वादात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *