नांदेड,(प्रतिनिधी)- जुना नांदेड भागातून काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी गायब झालेली दोन लहान मुले इतवारा पोलिसांनी काही तासातच शोधून ती दोन बालके पालकांच्या स्वाधीन केली तेव्हा त्यांनी पोलिसांबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्यांना शब्दात लिहिणे अवघड आहे.
जुना नांदेड भागातील चौफाळा भागात शनिदेव मंदिर आहे.तेथेच आर्यन उर्फ समर्थ अनिल हसनपल्ली आणि शाश्वत संतोष चपीलवार या दोन लहान बालकांचे कुटुंब राहतात.२२ सप्टेंबर रोजी हि दोन लहान बालके सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या दररोजच्या प्रक्रिये प्रमाणे बागडण्यासाठी शनिदेव मंदिराजवळ गेली.तास दिड तास झाल्यावर त्यांच्या आईंनी त्यांना पाहिले. पण बालके तेथे नव्हती. तेव्हातर कुटुंबीयांची पाचावर धारण बसली.बालकांच्या कुटुंबीयांनी त्वरित पोलीस ठाणे इतवारा गाठले.तेथे भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ नुसार गुन्हा क्रमांक २३४/२०२१ दाखल झाला.
इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके यांना बालकांच्या शोधाची जबाबदारी दिली.गणेश गोटके आणि काही पोलीस अमंलदारानी भरपूर मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला काही तासातच यश आले. अचानक गायब झालेली आर्यन उर्फ समर्थ अनिल हसनपल्ली आणि शाश्वत संतोष चपीलवार हि दोन बालके इतवारा पोलिसांनी गोदावरी नदीपलीकडे बकेट कारखान्याजवळ असल्याची माहिती मिळताच त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
बालके खेळत भागडत कधी संत दास गणू पूल पार करून गोदावरीच्या पलीकडे गेली हे त्यानाही कळलेच नाही.गणेश गोटके यांनी बालकांना इतवारा पोलीस ठाण्यात आणले.तेथील सर्वच पोलीस अंमलदार विशेष करून महिला पोलीस अमंलदारानी त्या बालकांच्या मनात विश्वास तयार केला.बालके आल्यावर याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.सर्वच कुटुंबीय आले. पोलिसांनी बालकांचे पुष्पहार देऊन स्वागत केले आणि त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
आपल्या बालकांसाठी पोलिसांनी केलेली मेहनत आणि त्यासाठी बालकांच्या कुटुंबीयांनी दिलेले धन्यवाद शब्दांपलीकडचे आहेत.शाब्बास इतवारा पोलीस शाब्बास असेच फक्त म्हणायचे आहे.पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,इतवाराचे पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांनी बालकांना शोधणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे
इतवारा पोलिसांनी काही तासातच दोन अल्पवयीन बालकांना शोधले; बालकांच्या पालकांनी दिलेले धन्यवाद शब्दांपलीकडचे