नांदेड (प्रतिनिधी)- अकरावीचा प्रवेश मिळविण्यासाठी एका युवतीच्या वडिलांकडून 4 हजार रूपये लाच मागणी करणाऱ्या दोन शिक्षकांविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे.
एका तक्रारदाराने 21 सप्टेंबर रोजी तक्रार दिली की, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड येथील उपप्राचार्य प्रल्हाद वामनराव इंगोले आणि सहशिक्षक ज्ञानेश्वर गोविंद गरूडकर हे दोघे त्यांच्या मुलीला अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी 4 हजार रूपये लाच मागणी करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची लाच मागणी पडताळणी 22 सप्टेंबर रोजी केली आणि लाच मागल्याची घटना निष्पन्न झाली. त्यानंतर आज मुदखेड पोलीस ठाण्यात महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेडचे उपप्राचार्य प्रल्हाद वामनराव इंगोले (56) रा. उल्हासनगर शिवरोड, नांदेड आणि सहशिक्षक ज्ञानेश्वर गोविंद गरूडकर (51) रा.विनकर कॉलनी चौफाळा, नांदेड या दोघांविरूद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्राचार्य आणि सहशिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ही लाच मागणीची कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, अंकुश गाडेकर, निळकंठ यमुलवाड यांनी पूर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर सुध्दा माहिती देता येईल सोबतच पोलीस उपअधीक्षक धरमसिंग चव्हाण यांचा मोबाईल क्र. 9923417076 यावर सुद्धा लाचेबद्दलची माहिती देता येईल. तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य आणि सहशिक्षक अडकले लाच मागणीच्या जाळ्यात