नांदेड(प्रतिनिधी)-रेड अलर्टप्रमाणे 27 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत पावसाने जोरदार झडीच लावलेली होती. नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प जवळपास पुर्णपणे भरलेले आहेत. त्यामुळे प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात पाण्याची वाढ करत आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी अजुनही दक्ष राहण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

25 सप्टेंबरपासूनच पावसाने झडी लावली आहे. त्यामुळे हाती आलेले सोयाबिन पिक सुध्दा यंदा खराब झाले आहे. पाऊस जास्त पडत असल्यामुळे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. मालेगाव रस्त्यावर एक एस.टी.बसच्या डाव्या बाजूचे समोरचे आणि मागील टायर चिखलात रुतल्याने कांही काळ घबराहट झाली. विष्णुपूरी प्रकल्पातून सुध्दा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील गोवर्धनघाट स्मशानभूमी पुर्ण पणे पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे अंतिमसंस्कारांसाठी सध्या जुना मोंढा भागातील रामघाट शिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. वृत्तलिहिपर्यंत आजचे दुपारचे सत्र सुरू आहे. थोडे उन निघाले आहे. पण पावसाचा अलर्ट आहे.

पुन्हा 28 सप्टेंबर रोजी पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील कांही भागांमध्ये वृष्टी होणारच आहे. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुध्दा वरच्या बाजूला पाऊस पडत आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पा येणारा पाण्याचा येवा सुरू आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पातून सुध्दा पाण्याचा विसर्ग नियमित होत आहे. शहरातील जुन्या भागात असलेला संत दासगणु पुल यावर सुध्दा पाणी येण्याच्या मार्गावर आहे. शहरातील रस्त्यांची आवस्था अत्यंत वाईट झाली आहे. करोडो रुपयांचे उद्घाटन दाखवून रस्त्यांची कामे मात्र गुणवत्तेची न झाल्याने हा सर्व प्रकार घडत आहे. नाल्या बंद झाल्या आहेत. त्यांना उघडण्याची कांही एक प्रक्रिया नाही. शहरात अनेक जागी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था लिहिण्याच्या पलिकडची आहे. गोदावरी नदी काठी राहणाऱ्या नागरीकांनी लक्षता घेण्याची नक्कीच गरज आहे.

स्नेहनगर पोलीस वसाहतीच्या गेटसमोर असलेले अवाढव्य झाड पाऊस आणि अत्यंत जोरदार वाऱ्यामुळे कोलमडून पडले आहे. सुदैवाने यात कोणाला कांही इजा झाली नाही. प्रशासनाने हे झाड रस्त्यावरून बाजूला केले आहे.