नांदेड(प्रतिनिधी)-धार्मिक स्थळाजवळ नैसर्गिक विधी करण्याचे कारण विचारले तेंव्हा 9 जणांनी दोन अनुसूचित जातीच्या युवकांना मारहाण केली. हा खटला न्यायालयात चालला. या खटल्याचा निकाल देतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 9 जणांना 3 वर्ष कैद आणि प्रत्येकाला 20 हजार रुपये दंड असा एकूण 1 लाख 80 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. हा निकाल काल दि.27 सप्टेंबर रोजी झाला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया संपण्यासाठी रात्री 1 वाजता होता.
दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी तामसा येथील डॉ.आंबेडकरनगर मधील संदीप केरबा हनवते (28) यांना त्याचा मित्र जयकिंग शेषराव रावळे यांनी फोन केला आणि धार्मिक स्थळाजवळ नैसर्गिक विधी करणाऱ्या साहेबराव देशमुख यास विचारणा केली असता त्याने जयकिंग रावळेला मारहाण केली. त्यानंतर संदीप हनवते तेथे आले. त्यांनीही भांडणात मध्यस्थी केली तेंव्हा साहेबराव आणि त्यांच्या इतर मित्रांनी जयकिंग रावळे आणि संदीप हनवते यांना मारहाण केली, त्यात संदीपच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारण्यात आले आणि त्यात त्यांचे डोके फुटले. सोबतच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
याबाबत संदीप केरबा हनवते यांनी तामसा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमाकं 110/2016 कलम 329, 143, 147, 148, 149 आणि ऍट्रोसिटी कायद्यातील कलम 3(1)(10), 3(2)(5) नुसार दाखल झाला. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास तामसाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.डी. गोमारे हे होते. गुन्हा ऍट्रॉसिटी कायद्याच्या असल्याने त्याचा तपास भोकरचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक डी.एम.वाळके यांनी केला. त्यावेळी त्यांचे लेखणीक काम पोलीस अंमलदार आर.व्ही.गुंडेवार यांनी केले. या प्रकरणात पप्पु उर्फ विजय रामराव कदम (25), साहेबराव उत्तमराव देशमुख(22), दिपक सुदामराव जाधव (21), संभाजी सुदामराव जाधव (24), संतोष प्रकाश देशमुख(21), राहुल बालाजी सुर्यवंशी (21), करण मारोतराव शिंदे (21), अमोल सुर्यभान कऱ्हाळे (24), सतिश गणेश लक्षटवार (21) सर्व रा.तामसा यांच्याविरुध्द सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयात याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने 6 साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावा आधारे तामसा येथील 9 जणांनी संदीप हनवते आणि जयकिंग रावळे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली हा मुद्दा न्यायालयासमक्ष सिध्द झाला. न्या.बांगर यांनी या प्रकरणी सर्व 9 आरोपींना तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 20 हजार रुपये रोख दंड असा एकूण 1 लाख 80 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. सौ.एम.ए.बत्तुल्ला (डांगे पाटील) आणि ऍड.रणजित देशमुख यंानी बाजु मांडली. तामसा येथील पोलीस अंमलदार नारायण माटे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.
आरोपींना शिक्षा झाली तेंव्हा रात्रीचे 11 वाजले होते. त्यामुळे 9 आरोपींची रवानगी तुरूंगात झाली. पोलीसांना ही कायदेशीर प्रक्रिया करण्यात वजिराबाद पोलीसांनी सहकार्य केले. आज या 9 आरोपींची दंडाची रक्कम भरून त्यांना मिळालेली तीन वर्षाची शिक्षा स्थगित करण्यासाठी न्यायालयात घाई सुरू होती. यासाठी आरोपींना मदत व्हावी म्हणून नांदेड जिल्ह्याचा एक धडाकेबाज पोलीस न्यायालयात आरोपींच्या नातेवाईकांना मदत करत होता. सध्या तो कोठे तरी मोठ्या माणसाकडे सुरक्षा रक्षक आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
ऍट्रॉसिटी खटल्यात तामसा येथील 9 जणांना तीन वर्ष कैद ; 1 लाख 80 हजार रुपये दंड