नांदेड(प्रतिनिधी)-एकूण 19 चोरीचे गुन्हे करणाऱ्या आणि त्या प्रकरणांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपी यादीत नाव असलेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेचे समर्थ पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने गजाआड केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, विठ्ठल शेळके, हनुमानसिंह ठाकूर, देविदास चव्हाण, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड,बालाजी तेलंग, अफजल पठाण आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात तरबेज विश्र्वनाथ इंगळे यांना त्या आरोपीस पकण्यासाठी पाठविले. या पोलीस पथकाने लोहा येथे जावून संतोष उर्फ चॉकलेट्या बापूराव भोसले (38) रा.कुरूळा ता.कंधार ह.मु.शिरसाळा ता.परळी यास पकडले. त्याच्याकडून माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एक दुचाकी गाडी आणि सोनखेड पोलीसांच्या हद्दीतून केलेल्या चोरीतील एक 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असा 64 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संतोष भोसलेने माळाकोळी येथे-2, उस्माननगर-8, मुखेड-1, अर्धापूर-1, नांदेड ग्रामीण -1 असे एकूण 13 गुन्हे आणि इतर गुन्हे गेलेले आहेत. या 13 गुन्ह्यांमध्ये तो आरोपी पाहिजे या सदरात आहे.
चोरट्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले आहे.
अनेक चोरीचे गुन्हे करणारा आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केला