चंदीगड- संत नामदेव महाराज यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्त घुमान येथे 751वा शताब्दी सोहळा मोठया स्वरूपात साजरा करण्यात यावा यासाठी पंजाब चे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित यांची घुमान हरगोविंदपूर चे आमदार सरदार बलविंदरसिंघ लाड्डी यांनी काल चंदीगड येथे राजभवनात भेट घेतली आणि निवेदन देऊन चर्चा केली. घुमानचे सरपंच सरदार नरिंद्रसिंघ नंदी,जेष्ठ पत्रकार सरदार सरबजीतसिंघ बावा हे या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
संत नामदेव महाराज यांचे हे 751वे जन्म शताब्दी वर्ष आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शताब्दी साजरी करता आली नाही. यावर्षी शताब्दी साजरी केली जात आहे. पंजाब सरकारने हा सोहळा साजरा करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नामदेव दरबार कमिटी व घुमान हरगोविंदपूर चे आमदार सरदार बलविंदरसिंघ लाड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. जन्म शताब्दी निमित्त नांदेड हुन 12 कोटी मराठी माणसांच प्रतिनिधित्व करणारी घुमान यात्रा 18 नोव्हेम्बर 2021ला विमानाची हवाई सफर करत घुमान ला पोहचणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.