नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मिळणारे मासिक वेतन आणि भत्ते त्यांना सहज कळावेत म्हणून या सर्व माहितीची यादी प्रत्येक पोलीस घटक प्रमुखाने आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिध्द करावी असे परिपत्रक 29 सप्टेंबर रोजी जारी केले आहे.
पोलीस विभागातील बरेच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना अनुज्ञेय असलेले किंवा अदा करण्यात येत असलेले मासिक वेतन व माहिती त्यांच्याकडे नसल्यामुळे किंवा अपुरी असल्यामुळे ते अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांना व्हॉटसऍप संदेश करतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस घटक प्रमुखाने आपल्या कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेतन व भत्त्यांची माहिती दर्शनी भागात, सुचना फलकावर किंवा इतर कोणत्याही प्रकारे पोलीस अंमलदारांच्या नि दर्शनास आणून द्यावी. सोबतच शक्य नसेल तर ही माहिती प्रकाशित करावी असे या परिपत्रकात लिहिले आहे.
पोलीस महासंचालकांनी या परिपत्रकासोबत पोलीस अधिकारी, पोलीस अधिक्षक ते पोलीस शिपाई या सर्व अधिकाऱ्यांचे मुळ वेतन आणि त्यांना मिळणारे वेगवेगळे भत्ते यांचे परिष्ठ तयार करून पाठवले आहे. ज्यामध्ये सर्वात कमी मुळ वेतन असलेला पोलीस शिपाई 21700 ते 69100 असा आहे. तर पोलीस अधिक्षक 67700 ते 208700 असा आहे. त्यासोबतच वाहतुक भत्ता, विशेष वेतन, विशेष कर्तव्य भत्ता, आहार भत्ता, धुलाई भत्ता याचेही वर्णन या परिष्ठामध्ये लिहिले आहे. सोबतच प्रोत्साहन जोखीम भत्ता, आर्म आलाऊंस भत्ता, जलद प्रतिसाद पथक, दहशतवाद विरोधी पथक, फोर्स-1, प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक यांना काय भत्ते मिळावेत याचाही उल्लेख या परिपत्रकात केलेला आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जाहीर केलेल्या या परिपत्रकामुळे आपल्याला काय वेतन मिळावे, काय मिळते आहे याची तुलना पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार करू शकतील आणि समाधानी राहतील.
पोलीस महासंचालकांची पारदर्शकता; पोलीसांच्या वेतनाला जाहीर करण्याचे आदेश