पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात दोन आयपीएल अड्यांवर धाड

एका महिलेसह 10 जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल ; 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी भागात एका आयपीएल जुगार अड्यावर छापा मारला. तसेच याच शाखेच्या दुसऱ्या पथकाने खडकपुरा भागात आयपीएल जुगार अड्यावर छापा मारला. या दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेने 3 लाख 37 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी सिडको येथे पाच जणांविरुध्द आणि खडकपुरा येथील 4 जणांविरुध्द ज्यामध्ये एक महिला आहे अशा 10 जणांविरुध्द जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेत दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. काल दि.2 ऑक्टोबर रोजी मुंबई विरुध्द दिल्ली हा आयपीएल क्रिकेट सामना सुरू होता. त्यानुसार एका पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, पद्मसिंह कांबळे, संजीव जिंकलवाड, बालाजी यादगिरवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार हे होते. दुसऱ्या पथकात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, गणेश धुमाळ, राजवंशी, शेख महेजबीन, कलीम हे होते.
एमआयडीसी सिडको भागात पोलीसांनी रेणुका इंडस्ट्रीज येथे छापा मारला तेथे मयुर संतोष वर्मा (30) आशिष ओमप्रकाश मालपाणी (27), द्वारकादास ओमप्रकाश मालपाणी (24), सय्यद इरशाद सय्यद चॉंद पाशा (26), राजेश रघुनाथ राठोड (27) असे पाच जण सापडले. हे सर्व दिल्ली मुुंबई या सामन्यावर सट्टा चालवत होते. या सर्व लोकांकडे मिळून अनेक मोबाईल, चार्जर , अनेक वह्या, लॅपटॉप ज्यामध्ये त्यातील पानांवर सट्टा लावणाऱ्यांची नावे आणि त्यांच्या जिंकल्या हरल्याचा हिशोब लिहिला आहे. असा एकूण 1 लाख 69 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पांडूरंग भारती यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 703/2021 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या दुसऱ्या पथकाने अत्यंत गोपनिय ठिकाणी सुरू असलेला दुसरा आयपीएल अड्डा खडकपूरा भागात शोधला हा अड्डा शोयब मोहम्मद युसूफ अन्सारी यांच्या घरात सुरू होता. त्या ठिकाणी महम्मद आसिफ नदीम अन्सारी (40), शोयब अन्सारी युसूफ अन्सारी (30), भारत अंबादास गायकवाड(27) आणि एक 33 वर्षीय महिला असे चार जण सापडले जे आयपीएलचा जुगार अड्डा चालवत होते. सोबत या अड्याचा मुळ चालक कमल गणेशलाल बटावाले (यादव) हा आहे. या सर्व लोकांकडून अनेक मोबाईल, मोबाईल ठेवण्यासाठीची एक विशेष मशीन, एक सुटकेस, लॅपटॉप, सट्‌ट्याच्या हिशोबाच्या चिठ्या जप्त करण्यात आल्या. या सर्व मुद्देमालाची किंमत 1 लाख 68 हजार 100 रुपये आहे. दोन्ही आयपीएल जुगार अड्‌ड्यावर मिळून एकूण 3 लाख 37 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गंगाधर विठ्ठलराव कदम यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात एका महिलेसह चार जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 552/2021 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *