नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात पथके तयार करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी दिल्या होत्या. अत्यंत कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नावेत बसून प्रवास केला. पण अजूनही अवैध वाळू उत्खनन आणि पुरवठा बंद झालेला नाही. दि.3 जूनच्या पहाटे नाना-नानी पार्क जवळ रेती पुरवतांना एक ट्रकचा फोटा भेटला. यावरून रेतीचे अवैध उत्खनन बंद होणार नाही असेच दिसते किंवा ते कोणाला बंद करायचे नाही काय? फक्त शोबाजी करायची आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैध रेती उत्खनन करून ती अवैधरित्या पुरवठा करणाऱ्यांविरुध्द रेती घाट निहाय आणि तालुकानिहाय तहसीलदारांनी पथके तयार करावीत आणि हा अवैध धंदा बंद करावा अशी सुचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी दिली होती. त्याबद्दल प्रसार माध्यमांनी सुध्दा या वक्तव्याला प्रसिध्दी दिली होती. त्यानंतर कांही दिवसांत जिल्हाधिकारी डॉ.विपीन हे गाडी जाईल तितपर्यंत आणि नंतर पायी आणि पुढे नावेत बसून गोदावरी नदी पात्रात प्रवास केला आणि अवैध उत्खननाचे सर्वेक्षण केले आणि चुकीचे काम करणाऱ्यांविरुध्द कार्यवाहीच्या सुचना दिल्या. या संदर्भाने सुध्दा प्रसार माध्यमांनी भरपूर प्रसिध्दी केली होती. पण वाळू माफियांवर याचा कांही एक प्रभाव पडला नाही असे दिसते.
गेल्या तीन दिवसात आसना नदी आणि गोदावरी नदीतून आलेल्या जवळपास 50 गाड्या रात्री 1 ते 4 या वेळेत नांदेड शहरात बिनधास्त येतात आणि रेती पुरवठा करून जातात. या शिवाय छोट्या-छोट्या गाड्या मोजणे अवघड आहे. त्या तर अत्यंत छोट्या गल्लीत सुध्दा वाळू पुरवतात. गेली तीन दिवस रात्रीच्या रेती वाहतुकीची फोटो घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आज दि.3 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास यश आले. हा रेतीचा ट्रक शहरातील नाना-नानी पार्कजवळ रिकामा करण्यात आला. रात्रीला फोटो घेणे सुध्दा जीवावर बेतणारे आहे. फोटो काढतांना एखाद्या वाळू गाडीने फोटो काढणाऱ्याला चिरडले तर भारतीय दंड संहितेप्रमाणे 279, 304 चा गुन्हा दाखल होईल पण फोटो काढणाऱ्याचे कुटूंब उघड्यावर पडेल. याचा अर्थ भारताच्या लोकशाहीत 2 नंबरचे काम करणाऱ्यांना छुपी मदतच मिळते असा लिहिला तर चुक ठरणार नाही. महाराष्ट्र महसुल अधिनियम, गौण खनीज अधिनियम या कायद्यांमध्ये सुर्यास्त ते सुर्योदय हा काळ वाळूच्या वाहतुकीसाठी प्रतिबंधीत आहे. पण तोच काळ वाळू माफियांना आपला मोर्चा फत्ते करण्यासाठी सोईस्कर आहे. दिवसा वाळू माफियांविरुध्द त्यांना सांगून कार्यवाही त्यानंतर त्याची फोटोग्राफी आणि मग बातम्या प्रसिध्द करून घेतल्या म्हणजे अवैध वाळू उत्खनन आणि अवैध वाळू पुरवठा बंद होत नाही. हे स्पष्ट आहे.
सुर्यास्त ते सुर्योदय हा काळ वाळूची वाहतुक करण्यासाठी सुयोग्य काळ