पिस्तूल बाळगणारा युवक पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-दि.9 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या नेतृत्वात काम करणाऱ्या खास पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला बंदुकीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खास पथकातील पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार जसपालसिंघ कालो, बोधगिरे, दासरे, शेख इजराईल आणि अकबर पठाण असे पथक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असतांना दुधडेअरी जवळ एका युवकाकडे बनावट पिस्टल असल्याची माहिती प्राप्त झाली. खास पथकाने त्या युवकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव नितेश केशव डोंगरे (28) रा.बळीरामपूर असे आहे. त्याच्या ताब्यात एक बनावटी पिस्तुल आणि एक जीवंत काडतुस सापडले आहे. जसपालसिंघ कालो यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नितेश डोंगरेविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तूल पकडणाऱ्या खास पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
