नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्टला दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एका आरोपीची पोलीस कोठडी आज संपली पण दुसरा आरोपी अद्याप नांदेड ग्रामीण पोलीसांना भेटला नाही.
दि.18 ऑगस्ट रोजी एका 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती की, त्यांचा मुलगा संतोष जिजाऊ मुटकुळे याने गणेश शिंदे रा.हरबळ ता.लोहा याच्याकडून 30 हजार रुपये आणि नागेश येईलवाड रा.विष्णुपूरी याच्याकडून 50 हजार असे 80 हजार रुपये मेस चालविण्यासाठी घेतले होते. हे दोघे संतोष मुटकुळेकडून व्याज घेण्यासाठी दर महिन्याला त्यांच्या घरी येत होेते. चार महिन्यापुर्वी नागेशचे व्याज देण्यास संतोषला उशीर झाला. त्यावेळी नागेशने माझ्या मुलाची दुचाकी गाडी घेवून गेला होता. हे सर्व चालत होते. कोविडमुळे मेसचा व्यवहार बंद झाला. त्यामुळे पैसे देणे अवघड झाले. दि.14 ऑगस्ट रोजी संतोष घरी नसतांना गणेश शिंदे आला आणि संतोषच्या पत्नीसमोर उभे राहुन माझे पैसे दिले नाही तर मी तुला उचलून नेतो असे म्हणाला. 15 ऑगस्ट रोजी संतोष गणेशला भेटायला जातो म्हणून गेला पण परत आला नाही. 18 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांना कळले की, संतोषचे प्रेत विष्णुपूरी येथील मंदिराच्या पाठीमागे नदीत सापडले आहे. माझा मुलगा संतोष याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गणेश शिंदे रा.हरबळ ता.लोहा आणि नागेश येईलवाड रा.विष्णुपूरी हे दोघे जबाबदार आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 593/2021 कलम 306 आणि 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला.
या प्रकरणातील एक आरोपी नागेश येईलवाड यास आज दि.12 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. पण या प्रकरणातील, फिर्यादीप्रमाणे संतोष मुटकुळेच्या मृत्यूस जबाबदार असणारा दुसरा आरोपी गणेश शिंदे अद्याप नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडलेला नाही.
ऑगस्टच्या गुन्ह्यातील एक आरोपी सापडला दुसरा आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडत नाही