नांदेड(प्रतिनिधी)-विक्री करण्यासाठी हातभट्टीची दारु साठा करून ठेवणाऱ्या एकाला उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श.सं.धपाटे यांनी 25 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.दंड भरला नाही तर दोन महिने साध्या कैदेत राहावे लागेल.
दि.27 ऑगस्ट 2017 रोजी उमरीचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शहादेव खेडकर, शिंदे हे आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसोबत गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अस्वलदरी (तांडा) ता.उमरी येथे हातभट्टीची दारु विक्री होत आहे. त्यानुसार त्यांनी सुदाम गणा राठोड (35) याच्या शेतात छापा मारला. तेथे हातभट्टीची 10 लिटर दारु सापडली. पोलीसांनी सुदाम गणा राठोड विरुध्द दारु बंदी कायद्याच्या 65(ई) प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात याप्रकरणी पाच साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी मांडलेला युक्तीवाद लक्षात घेवून न्या.धपाटे यांनी सुदाम गणा राठोडला 25 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली. दंड भरला नाही तर सुदामला दोन महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल. उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय कंधारे, बालाजी बोडके यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.
हातभट्टी विक्री करणाऱ्या एकाला उमरी न्यायालयाने 25 हजार दंड ठोठावला