नांदेड(प्रतिनिधी)-सातारा येथून माहूरच्या आई रेणुकेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या 9 हिरकणींपैकी एका हिरकणीच्या दुचाकीला भोकर फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात 43 वर्षीय शुभांगी पवार यांचा मृत्यू झाला आहे.
सातारा येथील हिरकणी गटातील 9 महिला सदस्या दुचाकी गाडींवर प्रवासासाठी निघाल्या. नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात स्थापीत आदीशक्तीच्या साडेतीन पिठांचे त्यांना दर्शन घ्यायचे होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेवून त्यांनी या प्रवासाला सुरूवात केली. 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी 1 हजार 868 किलो मिटरच्या या प्रवासाला सुरूवात केली होती. दुसरे दर्शन त्यांनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे घेतले. त्यानंतर त्या नांदेडला पोहचल्या.
आज सकाळी सचखंड श्री हजुर साहिब यांचे दर्शन घेवून त्या माहुरकडे निघाल्या. भोकर फाट्याजवळ एका ठिकाणी शुभांगी पवार चालवत असलेली दुचाकी कांही कारणानी घसरली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टॅंकर क्रमांक जी.जे.12ए.टी.6957 चे चालक शुभांगी पवारच्या डोक्यावरून गेले. दुर्देवाने त्यांचे हेल्मेटपण निघून दुसरीकडे पडले होते. त्या दुर्घटनेत शुभांगी पवारचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अशोपूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरिक्षक कपिल आगलावे, पोलीस अंमलदार गजानन डौरे, वसंत शिनगारे, महेंद्र डांगे, रमाकांत शिंदे, मृत्यूंजय दुत गोविंद टेकाळे यांनी घटनास्थळी जावून पुढील कार्यवाही केली. हिरकणींमधील मनिषा कायंदे, यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी टॅंकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अपघात घडताच टॅंकर चालक पळून गेला होता. आदीशक्तीच्या दर्शनाची इच्छा घेवून निघालेल्या हिरकणींना हा दुर्देवी प्रसंग सोसावा लागला.