अशोक चव्हाणांची आकाशला मदत ; आपण केलेल्या मेहनतीचे फळ कधी तरी मिळतेच असे सांगणारा प्रसंग

नांदेड(प्रतिनिधी)-आपले काम करत-करत जेंव्हा आपण चालत असतो त्यावेळी कोणी त्याची दखल घेईल, कोणी घेणार नाही अशीच परिस्थिती असते. कोणी चांगली दखल घेतली तर शाब्बासकी मिळते, कोणी कटाक्ष केला तर आपल्या मेहनतीचा विदुषक झाला असे वाटते. पण आपण ठरवलेले काम करत गेले तर कधीच तरी त्या कामाची पावती मिळतेच. असा एक प्रकार नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांनी आकाशाची दखल घेतली.ती सुध्दा अशा वेळेस ज्यावेळी आकाशला मदतीची सर्वात जास्त गरज होती. हा घटनाक्रम आता आकाशच्या जीवनामध्ये कोरीव काम केल्यासारखे नोंदवले जाईल.
अनेक राजकीय पक्षांमध्ये मिडीया प्रमुख आहेत. हे मिडीया प्रमुख आपल्या पक्षाची बाजू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यातून राजकीय पक्षांना किती यश येते किंवा त्यांच्याविरुध्द वातावरण तयार होते. हा त्या -त्या घटनांवर आधारीत विषय आहे. पण मिडीया प्रमुख म्हणून काम करणारे राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुध्दा पुर्णपणे माहित असतात. नांदेडमध्ये असलेला एक मिडीया प्रमुख हा फक्त अशोक चव्हाण यांच्याव्यक्तीगत विषयांवरचा मिडीया प्रमुख म्हणून काम करतो त्यांचे नाव आकाश सोने असे आहे. आकाश सोनेला कोणताही कॉंगे्रस कार्यकर्ता कालपर्यंत ओळखत नव्हता. पण अशोक चव्हाणांवर त्याची असलेली श्रध्दा आणि प्रेम यामुळे अशोक चव्हाणांचे राजकीय काम, कौटूंबिक कार्यक्रम, सामाजिक कार्य, त्यांनी घेतलेल्या लोकांची दखल अशा सर्व घटनांना आकाश सोने आपल्या नावावरील सामाजिक संकेतस्थळांवरून नेहमीच प्रसिध्दी करत राहिले. कॉंगे्रस कार्यकर्ते तर सोडाच पण अशोक चव्हाण सुध्दा आकाश सोनेला कधी भेटले नव्हते, कधी पाहिले नव्हते, आकाश सोने सुध्दा कधी अशोक चव्हाणच्या जवळ जावे यासाठी प्रयत्न करत नव्हते. का माहित नाही पण आकाश सोने अशोक चव्हाणांच्या सर्व कामांना आपल्या सामाजिक संकेतस्थळांवरून प्रसिध्दी देणे हेच त्यांचे मुळ काम करत राहिले. हे काम सुरूच होते. दरम्यान हळूहळू ही बाब अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहचली ती अशी की, आकाश सोने नावाचा कोणी व्यक्ती हा आपल्यासाठी काम करतो पण आपल्याला तो माहित नाही. या प्रसंगात सर्व काही सुरू होते. अशोक चव्हाणांची प्रसिध्दी करणे पत्रकार नसतांना सुध्दा आकाश सोनेने आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी होती. एक-एक दिवस जात होता. सर्व कांही आलबेल सुरू होते.
नियतीचा खेळ कोणालाच माहित नाही असे म्हणतात. आकाश सोनेच्या आरव नावाचा दोन वर्षीय पुत्र आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो आजारी झाला. नांदेडमध्ये अनेक जागी तपासणी केली, औषधोपचार दिले. पण आरवच्या परिस्थितीमध्ये काही बदल झाला नाही. आकाश सोनेने आपला पुत्र आरव यास औरंगाबादच्या संजीवनी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले आणि येथे एक मोठा डोंगर आकाश सोनेसमोर उभा होता. उपचार होतील पण त्यासाठी लागणारी आर्थिक ताकत आकाश सोनेकडे नव्हती. आकाश सोनेने आपल्या सामाजिक संकेतस्थळावरून आपल्या पुत्राचा दवाखान्यातील फोटो अपलोड केला आणि आता मला मदतीची गरज आहे अशी हाक दिली. कोठेच कांही प्रसिध्द व्यक्ती नसतांना आकाश सोनेने केलेल्या या मदतीच्या आवाहनाचा आर्जव अत्यंत जलदगतीने अशोक चव्हाण यांच्या पर्यंत पोहचला. अशोक चव्हाणांपर्यंत कांही पोहचेल आणि ते त्याची दखल घेणार नाहीत असे होणे जरा अवघडच आहे.
अशोक चव्हाणांनी त्वरीत औरंगाबादच्या संजीवनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला आणि आरवच्या तब्बेतीबाबत विचारणा केली. डॉक्टरांना एकाच शब्दात या बालकाला कांही कमी पडू देवू नका असा संदेश दिला. या एका वाक्याच्या संदेशात डॉक्टरांनी अशोक चव्हाण यांना दिलेला प्रतिसाद भरपूर कांही सांगतो. त्यानंतर डॉक्टरांनाच अशोक चव्हाण यांनी विचारले की आरवचे वडील तेथे आहेत काय तेंव्हा डॉक्टरांनी आपला फोन आकाश सोनेला दिला आणि मी अशोक चव्हाण बोलतोय हे शब्द ऐकताच आकाश सोने यांनी अत्यंत विनम्र प्रतिसाद देत अशोक चव्हाण यांच्याशी चार शब्द बोलले. या चार शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी सांगितलेला एक शब्द चिंता करू नको आणि आकाश सोनेने दिलेले आभार या दोन शब्दांमध्ये भरपूर मोठे जग सामावलेले आहे. आज आरवची परिस्थिती स्थिर आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे तो लवकरच प्रतिसाद देईल असे डॉक्टर सांगतात. आम्ही सुध्दा आमच्या लेखणीतून आरव लवकर बरा व्हावा अशा शुभकामना व्यक्त करीत आहोत.
अशोक चव्हाण ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आकाश सोनेला मदत करण्याचे सांगितले. अशोक चव्हाणांनी सांगावे आणि ते होणार नाही असे घडत नसते आणि झालेही तसेच. आकाश सोनेकडे आता मदतीची रिघ लागली आहे. त्यातून आकाश सोनेने आजपर्यंत अशोक चव्हाण यांना न भेटता त्यांच्या केलेल्या प्रसिध्दीचे हे फळ आहे. नाही तर आम्ही एक दोन कॉल बातमी लिहायची असेल तर त्यासाठी किती आढे-वेढे घेतो. आकाश सोनेने फक्त एकाच माणसाची प्रसिध्दी आपल्याच सामाजिक संकेतस्थळावर करून आपल्याला गरज आहे तेंव्हा मिळवलेली ही मदत म्हणजे निसर्गाने अशोक चव्हाणांच्या मस्तीक्षक लहरींमध्ये घातलेला तो दोरा आकाशच्यासाठी मदतीचा ठरला. कारण आपल्या गळ्यात आपण मोत्यांची माळा घालतो. मोत्यांना जेवढे महत्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व त्या मोत्यांना एकामाळेत जोडणाऱ्या दोऱ्याला आहे असाच कांहीसा हा प्रसंग आम्ही आमच्या लेखणीतून उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *