तरोडेकर मार्केटच्या कंत्राटदाराने फुथपाथसुध्दा गिळंकृत केला 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील अनेक मालमत्ता महानगरपालिकेने खाजगी कंत्राटदारांना देवून त्यांच्या सात पिढ्यांचे भले केले. कंत्राटदारांनी सुध्दा महानगरपालिकेच्या अर्थात नांदेडचा सर्वसामान्य माणूस मालक असलेल्या जागांवर आपल्या भाकरी भाजल्या. सध्या नव्यानेच उभ्या राहिलेल्या तरोडेकर मार्केटसमोरील पादचारी रस्ता सुध्दा कंत्राटदाराने आपल्या ताब्यात घेवून दुकाने विक्रीचा शाही थाट उभा केला आहे. पण महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याने फुथपाथवर केलेला कब्जा काढण्याची हिंमत दाखवलेली नाही.
                     नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या अर्थात नांदेडच्या सर्वसामान्य माणूस मालक असलेल्या अनेक जुन्या इमारती, अनेक भुखंड कांही कंत्राटदरांना विकासाच्या नावावर देवून महानगरपालिकेच्या खात्यात कांही रुपये जमवले. पण त्या जागा, त्या इमारती आता कायमच्या दुसऱ्यांच्या हक्कात जाणार आहेत. ज्या कंत्राटदारांना विकासाच्या नावावर हे काम दिले. त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले आणि त्याला जामीनदार महानगरपालिका झाली. याचा अर्थ कंत्राटदारांसाठी हा विकासाचा प्रताप हिंग लगे ना फिटकडी रंग चोखा असा झाला आहे. या तयार झालेल्या दुकानांना महानगरपालिकेच्यावतीने लिज देण्याचे अधिकारी कंत्राटदारांनाच आहेत. ज्या माणसांना आपले स्वत:ची स्वाक्षरी करण्यासाठी कांही मिनिटे लागत होती. असे व्यक्ती कंत्राटदारांच्यावतीने मुद्रांक कार्यालयात हा लिज प्रकार स्वाक्षरी करतात. महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी या सर्वांनीच कंत्राटदारांच्या सात पिढ्यांचे भले व्हावे असा हा सुरू केला प्रयत्न मागील दहा वर्षात कोणीच बंद पाडू शकला नाही अनेकांनी अनेक गर्जना केल्या. कोणी पत्रे फेकले. कोणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण हे सर्वचे सर्व मॅनेज झाले आणि सलटले. आज ही या तयार झालेल्या इमारती दिलेल्या नकाशाप्रमाणे कायदेशीर आहेत काय ? याची तपासणी कोणी केल्याचे कधीच दिसले नाही. तपासणी करण्याचे अधिकार  महानगरपालिकेला आहेत. त्यांनी स्वत:च परवानगी दिलेली आहे. त्यांना विक्री करण्याचे अधिकार दिले आहेत. मग महानगरपालिकेचे जाते काय ? कोण कशाला तपासणी करेल. यात एवढे मात्र नक्की की, नांदेडचा सर्व सामान्य माणूस ज्या संपत्तीचा मालक होता ती संपत्ती आता दुसऱ्यांच्या घशात गेली आहे.
                    कांही दिवसांपुर्वीच नव्याने तरोडेकर मार्केट बांधून तयार झाले. त्या मार्केटच्या पुर्व आणि पश्चिम बाजूला एक गल्ली आहे. त्यातील पश्चिम बाजूची गल्ली पुर्वी जेवढी रुंद होती त्या मानाने आता कमी रुंद झालेली आहे. कुठे गेली ही गल्ली याचे काही उत्तर सापडत नाही. पुर्व बाजूला असलेल्या गल्लीमध्ये लाल कारपेट टाकून भव्य डिस्काऊंटमध्ये दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असे मोठ-मोठे बॅनर लावले गेले आणि त्या रेड कार्पेटवर बसून बॅंकवाले सुध्दा या दुकानात खरेदी करण्यासाठी कर्ज द्यायला तयार आहेत. म्हणजे कंत्राटदाराकडून मिळणारे व्याज आणि दुकानदारांनी कर्ज घेतल्यावर मिळणारे व्याज असा डबल व्याज फायदा बॅंकेलाच होणार आहे.
                    आज या तरोडेकर मार्केटच्या कंत्राटदारांने तर कहरच केला आहे. मार्केटसमोर असलेल्या पादचारी रस्ता (फुथपाथ) वर अगोदर भाजी विक्रेते बसत होते. आज तर कंत्राटदाराने या सर्व फुथपाथला गिळंकृत करून समोर स्टिलच्या रेलींग लावल्या आहेत आणि आतमध्ये फुथपाथवर लाल कारपेट पसरवून टाकले आहे.                          महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी तरोडेकर मार्केट कंत्राटदाराला दिले. त्यासोबत फुथपाथ पण दिला काय ? हा प्रश्न आजचा फोटा पाहिल्यावर लक्षात येईल. एखाद्या गरीब माणसाने आपले घर बनवतांना घराची एक भिंत बदलली तर त्यावर मोठा लवाजमा घेवून हातोडा चालविण्यासाठी तत्पर असलेल्या महानगरपालिकेला तरोडेकर मार्केटच्या कंत्राटदाराने गिळंकृत केलेला फुथपाथ दिसत नाही काय? हा प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी एखाद्या उच्च स्तरीय समितीची नेमणूक करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *