नांदेड(प्रतिनिधी)-वाहतूक शाखेच्या पोलीसांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आज बॉडी वॉर्न कॅमेरे वाटप केले आहेत. यासाठी 2 लाख 90 हजार 400 रुपये खर्च झाला आहे. या कॅमेऱ्याद्वारे 15 मिटर पर्यंतचे चित्रीकरण करता येते आणि रस्त्यावर जनतेतील लोकांसोबत वाद घालण्याची गरज पोलीसांना राहणार नाही.
आज सकाळी शहर वाहतूक शाखा क्रमांक 1 च्या कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, चंद्रसेन देशमुख यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी 12 बॉडी वॉर्न कॅमेरे वाटप केले. हा प्रत्येक कॅमेरा 24 हजार 200 रुपयांचा आहे. रस्त्यावर काम करतांना जनतेसोबत येणाऱ्या अडचणी या कॅमेऱ्यामुळे कमी होतील असे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. या कॅमेऱ्यासाठी एकूण 2 लाख 90 हजार 400 रुपये खर्च आला. यासोबत वाहतुक शाखेसाठी 60 लोखंडी बॅरीकेट, 120 कार व मोटारसायकल जॅमर, 50 प्लॅस्टीक कोण बॅरीकेट, 200 बॅटन, 200 रिफ्लेक्टेड जॅकेट असे साहित्य सुध्दा दिले.
या कार्यक्रमानंतर या कॅमेऱ्याची माहिती सांगतांना पोलीस निरिक्षक चंद्रकांत कदम म्हणाले की, पोलीस अंमलदारांचे काम यामुळे पारदर्शक होईल. हा कॅमेरा 15 मिटर पर्यंतचे चित्रीकरण करू शकतो. या कॅमेऱ्याची मेमरी 128 जीबी आहे. हा कॅमेरा रात्री सुध्दा चित्रीकरण करू शकतो. रस्त्यावर पोलीस अंमलदारासोबत होणारी वादा-वादी यामुळे टळेल. तसेच तक्रारदार आणि ठाणेअंमलदार यांच्यात सुध्दा सुसंवाद तयार होईल. विविध बंदोबस्त करतांना गर्दीच्या ठिकाणी या कॅमेऱ्याचा उत्तम उपयोग होईल.
वाहतूक शाखेच्या पोलीसांना पोलीस अधिक्षकांनी दिले बॉडी वॉर्न कॅमेरे