कोरोना लेखा परिक्षणात निर्मल हॉस्पीलच्या घोटाळा गौतम जैन यांनी समोर आणला

प्राणवायुचे वेगळे पैसे लावले; एका दवाखान्याची ही आवस्था; जिल्ह्यातील सर्वच दवाखान्यांचे लेखा परिक्षण केले तर?
नांदेड(प्रतिनिधी)-  येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी कोरोना काळातील उपचारासंदर्भाने झालेली बिल मागणी याबाबत मे2021 महिन्यात झालेल्या लेखा परिक्षणाची प्रत उपलब्ध झाली आहे. त्यात निर्मल न्युरोकेअर ऍन्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने 17 कोरोना रुग्णांकडून 70 हजार 600 रुपये जास्त घेतले आहेत अशी सत्यता समोर आली आहे. जास्तीचे घेतलेले पैसे दोन दिवसांत परत द्यावे असेही या लेखापरिक्षा लिहिले आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याची यावर स्वाक्षरी आहे. पण अद्याप कोणालाही पैसे देण्यात आले नाहीत असे गौतम जैन यांनी सांगितले. हे लेखा परिक्षण फक्त एका रुग्णालयाचे आहे. जिल्ह्यातील इतर दवाखान्यांच्या लेखा परिक्षाची माहिती उपलब्ध नाही. 
                     कोरोना काळात सप्टेंबर 2020 मध्ये प्रल्हाद घनशाम टेकाळे या रुग्णाचा निर्मल हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. त्या रुग्णाचे एकूण बिल 3 लाख 43 हजार 771 रुपये होते. पण उपचाराच्या बिलातील उर्वरीत रक्कम दिल्याशिवाय रुग्णाचे प्रेत घेवून जाता येणार नाही. असा पवित्रा निर्मल हॉस्पीटलने घेतला आणि त्यात गौतम जैन यांनी उडी घेतली. त्यावेळी गौतम जैन यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. तरी पण गौतम जैनने या कोरोना बिलाच्या प्रकरणाचा पाठपुरावा सोडलाच नाही. 
                     त्यावर लेखा परिक्षण करण्याचे आदेश झाले. हे लेखा परिक्षण मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले. हे लेखा परिक्षण पुर्ण करून 5 मे 2021 रोजी त्याची माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठवली. पण मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती गौतम जैन यांना 22 ऑक्टोबर 2021 रोजी दिली. ज्यात निर्मल हॉस्पीटलमध्ये 17 लोकांनी कोरोना उपचार घेतला. त्यातील 4 वगळता प्रत्येक रुग्णाच्या बिलामध्ये तफावत आली आहे. या तफावतीची एकूण बेरीज 70 हजार 600 रुपये आहे. पण गौतम जैन सांगतात या हॉस्पीटलमध्ये 90 ते 93 लोकांनी कोरोना उपचार घेतला होता. त्याबाबतची माहिती आलेली नाही. निर्मल हॉस्पीटलने दिलेल्या माहितीत 57 हजार 420 रुपये टेकाळे या रुग्णाकडून येणे शिल्लक आहे. 
                   या दिलेल्या लेखापरिक्षणातील माहिती सांगतांना गौतम जैन म्हणाले आयसीयु बिना व्हेंटीलेटर यासाठी 7 हजार 500 रुपये दररोज दर लावला आहे. त्यात पुन्हा आयसीयु 1200 रुपये दररोज असा दर लावला आहे. शासनाने 4000, 7500 आणि 9000 असे दर ठवले असतांना वेगळे 1200 रुपये लावून 15600 रुपये जोडले आहेत. सोबतच एक पीपीई किट परिधान करून डॉक्टर 50 रुग्ण तपासू शकतो पण लेखा परिक्षणात प्रत्येक रुग्णाला पीपीई किटसाठी 1200 रुपये दर लावण्यात आला आहे. शासनाच्या नियमावलीप्रमाणे पीपीई किटसाठी फक्त 600 रुपये दर लावला जावू शकतो असे गौतम जैन म्हणाले. औषधी बिलासाठी प्रल्हाद टेकाळेच्या बिलात 1 लाख 71 हजार 351 रुपये लावण्यात आले आहेत. ते पैसे तर सर्वचे सर्व रुग्णानी दिले आहेत असे गौतम जैन सांगत होते. अशी सर्व चर्चा होवून सुध्दा प्रल्हाद टेकाळेच्या बिलामध्ये 32 हजार 200 रुपये परत द्यावेत असे असतांना आज पर्यंत ते पैसे देण्यात आले नाहीत. प्राणवायूचे पैसे 30 हजार रुपये जादा आकारले आहेत असे सुध्दा लेखा परिक्षणात लिहिले आहे. ते बिलातून कसे कमी झाले हे दाखवले नाही. यामुळे या सर्व बिलामध्ये पुन्हा गोंधळच आहे. असे गौतम जैन सांगतात. 
                     नांदेडमधल्या असंख्य दवाखान्यांनी कोविड काळात केलेला धंदा या लेखा परिक्षणाने चांगलाच चर्चेला आला आहे. एका दवाखान्याच्या लेखा परिक्षणात 90 कोरोना रुग्णानी उपचार घेतला असतांना फक्त 17 लोकांची माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा उपचार करणाऱ्या सगळ्याच दवाखान्यांचे अत्यंत बारकाईने आणि पारदर्शकपणे लेखा परिक्षण केले तर ज्या समाजात डॉक्टरांनी जन्म घेतला त्यांनी या समाजाला किती मोठ्या स्वरुपात लुटले आहे हे स्पष्टपणे समोर येईल असे गौतम जैन म्हणतात. त्यामुळे कोरोनाचे कवित्त्व कधी संपेल हे आज सांगता येणार नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *