नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.23 ऑक्टोबर रोजी रिंकु राजगुरू उर्फ आर्ची या अभिनेत्रीच्या हाताने किसान मॉलचे उद्घाटन झाले. तिला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी आपली दिवाळी साजरी केली. पोलीसांनी किसान मॉल उद्घाटन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
काल 23 ऑक्टोबर रोजी फुले मार्केटसमोर किसान मॉलचे उद्घाटन झाले. या मॉलचे उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण, अभिनेत्री रिंकु राजगुरू उर्फ आर्ची यांना बोलावण्यात आले होते. आर्चीला पाहण्यासाठी जमलेल्या तुफान गर्दीत कांही तास एक मार्गी रस्ता बंद राहिला आणि जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी आपली साधना पुर्ण करत अनेक जणांचे पॉकीट मारले. कांही जणांचे मोबाईल चोरीला गेले. त्यातील दोन जणांचे मोबाईल चोरी गेल्याचा प्रकार गुन्ह्याच्या स्वरुपात शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे. या दोन मोबाईलची किंमत 63 हजार 200 रुपये आहे. कांही जणांचे पॉकीट मारले गेले पण त्यात पैसे नव्हते तर महत्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे असे प्रकार नोंद या सदरात दाखल करण्यात आले. कांही जणांनी पॉकीट गेले , मोबाईल गेले तरीपण त्याची नोंद पोलीस ठाण्यात दिली नाही.अशा या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यात आर्चीच्या आगमनाने जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी आपली दिवाळी मात्र साजरी केली.
दरम्यान त्या ठिकाणी जमलेली गर्दी आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा विसर आयोजकांना पडल्यामुळे पोलीस उपनिरिक्षक भगवान सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किसान मॉलच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून, शासनाच्या नियमांना दुर ठेवून, सोशल डिस्टंसींगचे पालन न करता, तोंडाला मास्क न लावता हा उद्घाटन सोहळा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल अशी कृती करून शासकीय आदेशांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
आर्चीच्या आगमनाने चोरांनी साजरी केली दिवाळी; आयोजकांवर गुन्हा दाखल