नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने खासदार चिखलीकर यांच्या कारेगाव येथील पेट्रोल पंपाजवळ जबरी चोरी करणाऱ्या तीन गुन्हेगारांपैकी एकाला पकडले आहे. या आरोपीला पुढील तपासासाठी सोनखेड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, दमदार,चपळ पोलीस अंमलदार गोविंदरावजी मुंडे, गुंडेराव कर्ले, देविदास चव्हाण, संजय जिंकलवाड, मोतीराम पवार, विठ्ठलजी शेळके, अर्जुन शिंदे यांनी 25 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहिती आधारावर हॉटेलवाडी तांडा ता.लोहा येथून काशिनाथ शिंदे रा.निळा यास ताब्यात घेतले. विचारपुस केली तेंव्हा काशीनाथ शिंदे, सतिश रामजी भोसले, वैभव उर्फ रावण किशन भोसले या तिघांनी मिळून खा.चिखलीकर यांच्या कारेगाव येथील पेट्रोलपंपाजवळ वाहनात झोपलेल्या व्यक्तीचे पैसे आणि मोबाईल फोन बळजबरीने चोरल्याची माहिती प्राप्त झाली. बळजबरीने चोरलेला फोन सतिश भोसले याच्याकडे आहे अशी माहिती काशिनाथ शिंदे याने पोलिसांना दिली. पोलीसांनी आरोपीस पुढील तपासासाठी गुन्हा क्रमांक 138/2021 मध्ये सोनखेड पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.