नांदेड(प्रतिनिधी)-कैलास बिघानीया गॅंगमधील चार जणांची मकोका न्यायालयातील पोलीस कोठडी संपल्यानंतर आज एकाला 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिल्याचे आदेश मकोका न्यायालयाचे न्यायाधीश एन.के.गौतम यांनी दिले आहेत. इतर तिघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
नांदेडमध्ये अनेक गुन्हे करून आपले नाव, आपल्या गॅंगचे नाव मोठे करणाऱ्या कैलास बिघानीया आणि त्याच्या गॅंगने केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने इतवारा पोलीस ठाण्यात 20 जुलै 2021 रोजी विक्की ठाकूर नावाच्या युवकाचा खून करण्यात आला. त्याप्रकरणाचा गुन्हा क्रमांक 176/2021 दाखल होता. या प्रकरणात नितीन जगदीश बिघानीया, कैलास जगदीश बिघानीया, ज्योती जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी, अशोक गंगाधर भोकरे, रमेश उर्फ सोम्या सुरेश कत्ते, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे, मयुरेश सुरेश कत्ते अशा 11 जणांना अटक झाली.
या गुन्ह्यात पुढे मकोका कायद्याची वाढ झाली. सर्व अटकेत असलेल्या 11 जणांविरुध्द मकोका न्यायालयात दि.22 ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी मागण्यात आली तेंव्हा पोलीसांनी मयुरेश सुरेश कत्ते, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी या चार जणांची पोलीस कोठडी मागितली. इतर सात आरोपींची पोलीस कोठडी मागण्याचा हक्क पोलीसांनी राखून ठेवला होता. 22 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने 4 जणांना 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
आज चार जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा तपासिक अंमलदार पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अमंलदारानी पोलीस कोठडीतील चौघांना न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात केली. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची कारणे न्यायालया समक्ष मांडली. युक्तीवाद ऐकून न्या.एन.के.गौतम यांनी चौघांपैकी दिगंबर टोपाजी काकडे याची पोलीस कोठडी 30 ऑक्टोबर पर्यंत वाढवून दिली आहे. इतर तिघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
