नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या गणवेश वाटपात झालेला घोळ स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक पोलीस घटकातील प्रभारी अधिकाऱ्याकडून माहिती दोन दिवसात पाठविण्यात यावी असे आदेश गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रत्येक पोलीस अंमलदाराकडून 552 रुपये घेवून त्यांना रेमंडस् कंपनीचे गणवेश कापड देण्यात येणार होते. हा आदेश पोलीस महासंचालकांचा होता. कारण राज्यातील सर्व पोलीसांचा गणवेश रंग एकच दिसावा अशी त्या मागील मुळ भावना होती. नांदेड जिल्ह्यात पोलीसांच्या गणवेश वाटपात घोळा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर चौकशी सुरू झाली आणि 25 ऑक्टोबर रोजी गणवेश वाटपाचा सर्व अभिलेख मागविण्यात आला होता.
त्या अभिलेखाची तपासणी झाल्यानंतर गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांनी एक बिनतारी संदेश जारी केला आहे. तो सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व पोलीस निरिक्षक, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतुक शाखा, पोलीस मुख्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष, महिला सहाय्यक कक्ष, संगणक कक्ष, सायबर सेल व इतर सर्व शाखांना पाठविण्यात आला आहे. या पत्रानुसार आपल्या विभागात नियुक्तीस असलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडे विचारणा करून ज्यांनी रेमंडस् कंपनीचे कपडे अनुदानीत कॅन्टीन मार्फत मिळावे म्हणून 552 रुपये भरले आहेत. पण त्यांना कपडे मिळाले नाहीत अशा सर्व पोलीस अंमलदारांची यादी दोन दिवसांत पाठविण्यात यावी असे नमुद आहे. रेमंडस् कंपनीच्यावतीने देण्यात येणाऱ्या कपडे प्रकरणात घोळ झाला हे आता जवळपास सिध्दच झाले आहे. कांही पोलीस कर्मचाऱ्यांचा 552 रुपये भरल्यानंतर मृत्यूपण झालेला आहे. त्यांचा हिशोब कोण पाहिल ?
पोलीस गणवेशातील कपड्यांचा घोळ अद्याप संपला नाही