नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीचा फेरफार करून देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून आज 10 हजार रुपयांचा पहिला लाचेचा हप्ता स्विकारणाऱ्या तळणी सज्याच्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
25 ऑक्टोबर रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, मौजे तळणी ता.हदगाव या सज्जाचे तलाठी संजय गजानन मेहुनकर हे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीनीचा फेरफार करून नवीन सातबारा देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागणी करीत आहेत. 27 ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी केली तेंव्हा तलाठी मेहुनकरने 12 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजीच तलाठी मेहुनकर यांच्या हदगाव येथील खाजगी कार्यालय परिसरात मेहुनकरने तक्रारदाराकडून 10 हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता स्विकारला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारलेल्या संजय गजानन मेहुनकर (40) या तलाठ्यास पकडले आहे.
लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 288/2021 दाखल केला आहे. ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधिक्षक धरमर्सिंग चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ माने, दत्ता केंद्रे, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, सचिन गायकवाड आणि मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.