राज्यभरातील पोलीसांसाठी पोलीस महासंचालकांनी दिवाळी भेट द्यावी ही अपेक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-बृह्नमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बृह्नमुंबई पोलीस अंमलदारांना 750 रुपयांच्या वस्तु पोलीस कल्याण अनुदानीत कॅन्टीनमधून विनामुल्य देण्याचे आदेश करून मुंबई पोलीसांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. याच आधारावर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीसांना अशीच कांही दिवाळी भेट देण्याची योजना जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बृह्नमुंबर्ई मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 28 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कल्याण निधीतून सर्व पोलीस बांधवांना दिवाळी भेट योजना जारी केली. या दरम्यान नायगाव अनुदानीत पोलीस कॅन्टीन व इतर पाच उपकेंद्र ताडदेव, वरळी, कलिना, मरोळ आणि राजभवन येथे ही योजना अंमलात येईल. बृह्नमुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस बांधवांना दिवाळी 2021 च्या निमित्ताने त्यांना 750 रुपये किंमतीच्या वस्तु विनामुल्य मिळतील. यापेक्षा जास्त रक्कमेची खरेदी केली तर त्याचे पैसे भरणा करावे लागतील. ही योजना 30 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 या दरम्यान सुरू राहिल. मुंबई पोलीस दलातून प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी असलेल्या पोलीसांना सुध्दा या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबई पोलीस सोडून इतर पोलीसांना हा लाभ नाही. एका पोलीस अंमलदाराला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
बृह्नमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या आधारावर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यभरातील पोलीस अंमलदारांसाठी अशीच कांही दिवाळी भेट योजना लागू करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मागे नागपूर पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले होते त्याचप्रमाणे हेमंत नगराळे यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यभरातील इतर पोलीस अंमलदारांसाठी पोलीस महासंचालकांनी आदेश करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.