नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी गेल्या अनेक दिवसापासून केलेल्या परिश्रमामुळे आणि आघाडीतील सर्व पक्षांनी ऐक्य भावनेने केलेल्या प्रचार कार्यामुळे देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 41 हजार 933 मतांनी दणदणीत पराभव करून अविस्मरणीय विजय मिळविला.
शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केल्यामुळे राज्य भाजपा अगदी चवताळून उठली आहे. महाविकास आघाडी सरकार, सरकारमधील मंत्र्यांना, त्यांच्या नातेवाईकांना त्रास देऊन सरकारला बदनाम करण्याची भाजपने आघाडी उभारली आहे. अशातच पंढरपूर विधानसभा मतदार संघातील विजयाने भाजपा नेते कार्यकर्ते अधिक चेकाळले आहेत. पंढरपूर नंतर होणाऱ्या देगलूर- बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कांहीही करून आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करायचेच असा भाजपाने चंग बांधला. स्वतःच्या पक्षात योग्यतेचा उमेदवार नसल्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या माजी आमदार असलेल्या सुभाष साबणे यांना शेवटच्या क्षणी जाळ्यात ओढून उमेदवारी दिली. निवडणूक प्रचाराच्या वेळी मोठ-मोठे नेते आणून सर्वप्रकारे प्रचार केला तर दुसरीकडे हलगर्जीपणामुळे पंढरपूरची पोटनिवडणूक हरल्याची जाणीव झाल्यामुळे महाविकास आघाडी विशेषतः कॉंग्रेसपक्ष अधिक सतर्क झाला. स्वर्गीय अंतापूरकर यांच्या पुत्रास अर्थात जितेश अंतापूरकर यांना तिकीट देऊन निवडणुकीस उभे केले. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपले सर्व कार्यकर्ते कामाला लावले. स्वतः देगलूर- बिलोली तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, व्यापारी, कर्मचारी यांच्यासह अनेक क्षेत्रातील मंडळींच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. अहोरात्र परिश्रम करून सूत्रबद्ध नियोजन केले. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन सोबत घेऊन योजनाबद्ध पद्धतीने प्रचार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना तसेच कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा यशस्वीपणे आयोजित केल्या. मध्यंतरी भाजपाने विविध प्रकारचे मुद्दे उचलून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी देगलूर पंचायत समिती कार्यालय परिसरात झालेल्या मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे व आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना 11 हजार 347 मते मिळाली. विवेक केरूरकर यांना 465, परमेश्वर वाघमारे यांना 155,डी.डी. वाघमारे यांना 215, अरुण दापकेकर यांना 143, साहेबराव गजभारे यांना 183, भगवान कंधारे यांना 274, मारोती सोनकांबळे यांना 243, एकमेव महिला उमेदवार विमल वाघमारे यांना 496, सदाशिव भुयारे यांना 486 मते मिळाली; तर 10 हजार 103 मतदारांनी ला मतदान केले. अशाप्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताने विजयी झाले. जितेश अंतापूरकर यांच्या विजयाचा आनंद देगलूर- बिलोली तालुक्यातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला.